मुंबई : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रेत दाखल झाले होते. त्यानंतर आता संजय राऊत उत्तरेत जाऊन भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर संजय राऊतांना पत्राचाळ प्रकरणात जामीन मिळाला होता. त्यावेळीच राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे हिंगोलीत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन राहुल गांधींची भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पंजाबमध्ये जाऊन भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
येत्या १९ जानेवारीला काँग्रेसची भारत जोडो यात्रा पंजाब आणि जम्मू-काश्मिरच्या सीमाभागात पोहचणार आहे. त्यावेळी १९ जानेवारीलाच संजय राऊत पंजाबमध्ये जाऊन भारत जोडो यात्रेत पदयात्रा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे सहकारी खासदारही सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे.