बीड : वृत्तसंस्था
आम्ही सकाळी उठल्यापासून एकमेकांना रामराम करतो, तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही शेतातूनही रामाचे स्मरण करू शकता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेऊ, असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. पण प्रभू रामचंद्राने केंद्र सरकार व राज्यातल्या सर्व मंत्र्यांना आरक्षण देण्याची सुबुद्धी द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
एका खासगी कार्यक्रमानिमित्त जरांगे-पाटील येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, आनंद इथेही साजरा करता येतो. भावना महत्त्वाच्या असतात. भावना असेल तर शेतातूनही आपण रामाचे स्मरण करू शकतो. ग्रामीण भागात आपण रोज सकाळी एकमेकांना भेटल्यावर सर्वप्रथम राम-राम घालतोच. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही अयोध्येला रामाच्या दर्शनाला जाऊ. पण प्रभू रामचंद्राने केंद्र सरकार व राज्यातल्या सर्व मंत्र्यांना आरक्षण देण्याची सुबुद्धी द्यावी. प्रभू रामचंद्रानेही अन्यायाच्या विरोधात लढाई केली होती. आम्हीदेखील आमच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढत आहोत. २० तारखेला मुंबईला जायचे ठरलेय, आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही सर्व समाज अयोध्येला जाऊ. ही शेवटची लढाई आहे, समाजातील मुले मोठी करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मनोज जरांगे-पाटील यांनी केले.