नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात भावाचे प्राण वाचवण्यासाठी मूत्रपिंड (किडनी) दान केली म्हणून एका महिलेला तिच्या पतीने व्हॉट्सअॅप कॉल करून फारकत दिल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी पत्नीला तीन तलाक म्हणत काडिमोड घेणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केल्याची माहिती शुक्रवारी अधिकाऱ्याने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तरन्नुम (४२) हिने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी धानेपूर ठाणे हद्दीतील तिचा पती मोहम्मद रशीदवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. तरन्नुम बौरियाही गावातील रहिवासी आहे. २५ वर्षांपूर्वी तिचा विवाह शेजारच्या जैतापूर गावातील मोहम्मदसोबत झाला होता. लग्नाला ५ वर्षे झाल्यानंतरही मूलबाळ होत नसल्याने मोहम्मदने दुसरे लग्न केले व तो सौदी अरेबियात निघून गेला. दरम्यान, तरन्नुम मुंबईत दाखल झाली व उदरनिर्वाहासाठी तिने शिलाई काम सुरू केले.
दरम्यान, तरन्नुमचा मोठा भाऊ मोहम्मद शाकीरचे मूत्रपिंड निकामी झाले. भावाचे प्राण वाचवण्यासाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. यानंतर तरन्नुमने सौदीतील पतीला फोन करून या घटनेची माहिती दिल्यानंतर आपले मूत्रपिंड भावाला दान केले. काही दिवसांनी पतीने तरन्नुमला फोन करत किडनीच्या बदल्यात भावाकडून ४० लाख रुपये घेण्यास सांगितले. तरन्नुमने यास नकार दिल्याने संतापलेल्या मोहम्मदने व्हॉट्सअॅप कॉल करून तीन वेळा तलाक म्हणत पत्नीला घटस्फोट दिला. तरन्नुमने ही माहिती सासरच्या मंडळींना सांगितल्यानंतर त्यांनी तिला घराबाहेर काढले. तेव्हापासून ती आपल्या माहेरी राहत होती. धानेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.