मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडील गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे खाते जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांच्यापैकी कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्यापैकी कोणाकडे गृहमंत्रालयाचे धुरा सोपवली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
मुख्यमंत्री पदानंतर सर्वात महत्त्वाचा समजला जाणाऱ्या खात्याचा कारभार गृहखात्याचा अनुभव असलेला जयंत पाटील यांच्याकडे हे खातं सोपवली जाण्याची शक्यता अधिक आहे. डिसेंबर 2008 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा भार सोपवण्यात आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर जयंत पाटलांनी गृहमंत्री पदाचा कारभार सांभाळला होता.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वरिष्ठतेच्या पातळीनुसार विचार केल्यास अजित पवार यांच्यानंतर जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. सद्या उपमुख्यमंत्री पदाचा कारभार अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयंत पाटील किंवा दिलीप वळसे-पाटील यांच्या नावे सध्या गृहमंत्री पदाच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत.