अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून अमलात येत असलेल्या चालक विरोधी कायद्याच्या विरोधात अक्कलकोटमधील सर्व वाहनांचे चालक वर्ग एकत्रित येऊन संताप व्यक्त करत तहसीलदारांना रास्ता रोको करण्यासंदर्भात निवेदन दिले आणि ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता या कायद्याला विरोध म्हणून अक्कलकोट – सोलापूर हायवेवर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.या कायद्याअंतर्गत अपघात झाल्यास चालकांना १० वर्षे कैद आणि ७ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात येणार आहे.
कोणत्याही राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर चालकांना पुरेशा सुविधा नाहीत, विमा संरक्षण नाही,चोरांपासून संरक्षण नाही, दर दीडशे किलोमीटरला आराम करण्यासाठी सुसज्य वाहन तळाची व्यवस्था नाही, कामाच्या तासाचे बंधन नाही, एखाद्या रस्त्या अपघाता वेळी बघ्यांच्या गर्दी मधून होणाऱ्या जीव घेण्या मारहाणीतून संरक्षण नाही असे असताना आमचे चालक बांधव घरापासून आपल्या कुटुंबापासून दूर राहून काम करतात. त्यांचे प्रश्न मार्गी न लावता उलट या कष्टकरी बांधवांच्या विरोधातील हा काळा कायदा मागे घेण्यात यावा म्हणून सर्वजण आम्ही एकत्र येत असल्याचे चालकांनी यावेळी बोलताना सांगितले.या कायद्याच्या विरोधात अक्कलकोट तालुक्यातील सर्व चालक बांधव मिळून गटतट वेगवेगळ्या संघटना पक्ष विसरून चालक एकता नावाखाली एकत्र येत आहोत.
या संदर्भात महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करून आम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.रास्ता रोको दिवशी सकाळी साडेदहा वाजता हायवेवरती सर्वजण आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून रास्ता रोको करून या कायद्याचा निषेध आम्ही नोंदवणार आहोत,असेही पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.यासंदर्भात तहसीलदार बाळासाहेब सिरसट व अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विठ्ठल चव्हाण, सुरेश रणझुंजार, सुदर्शन शितोळे, महिबूब तासेवाले,मोईन कुरेशी, मुबारक खडकाळे, सुदर्शन जाधव, मल्हारी रुपनर ,हनुमंत रुपनर, शंकर रुपनर, मारुती चोरमुले ,श्रीमंत कोळेकर, मौलाली शेख, संदीप पवार ,मुस्तफा मदार ,असिफ पठाण, इमाम पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.