अहिल्यानगर : वृत्तसंस्था
देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरु असताना आता अहिल्यानगरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मातंग समाजाच्या तरुणाला गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी फोनद्वारे पीडित तरुणाशी तसेच त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आहे.
या घटनेची अधिकची माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथील मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणाला त्याच गावातील 15 ते 20 गुंडांनी गावातून उचलून अज्ञात स्थळी नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या तरुणाच्या हाता-पायांवरून मोटारसायकल घालून हात पाय मोडले. इतकेच नव्हे तर फायटरने तोंडावर जबर मारहाण करून डोळा निकामी केला. एवढ्यावरच न थांबता या गुंडांनी पीडित तरुणाच्या तोंडावर व शरीरावर सगळ्यांनी लघवी केल्याचा घृणास्पद प्रकार केला आणि तिथून पळ काढला. तसेच हे गुंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
दरम्यान, पीडित तरुण अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव प्रा. किसन चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दवाखान्यात जात तरुणाची भेट घेतली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी फोन करत पीडित कुटुंबाशी संपर्क साधला व भेटायला येणार असल्याचे सांगत धीर दिला. तसेच आरोपींवर मकोका लावण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना प्रकाश आंबेडकर यांनी किसन चव्हाण यांना दिल्या आहेत. यावेळी नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, उत्तरचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.