सातारा : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आज १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यावेळी आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी रात्री किल्ले अजिंक्यतारावर मशाल महोत्सव आणि लेजर शोचे आयोजन करण्यात आले. यामुळे किल्ले अजिंक्यतारा हजारो मशालींनी उजळून निघाला, तर सातारा शहर लेजर शोच्या प्रकाशात न्हाऊन निघाले.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती यांच्यावतीने रविवारी किल्ले अजिंक्यतावर मशाल महोत्सव, सुनील लाड (कवलापूर, सांगली) यांचे व्याख्यान आणि विविध संस्था व व्यक्तींचा सन्मान सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमाला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, अनेक मान्यवर, असंख्य कार्यकर्ते आणि हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.
रात्री युवक व युवतींचे जथ्थेच्या जथ्थे हातात मशाली घेऊन गडावर आले. गडावर सर्वत्र हे मावळे हातात मशाल घेऊन उभे राहिले. यानंतर एक- एक मशाल पेटली आणि हजारो मशाली गडाच्या सर्व तटबंदीवर पेटल्या. यामुळे अजिंक्यतारा उजळून निघाला. किल्ल्यावरून सातारा शहरावर लेजर शो टाकण्यात आला. यामुळे सातारा शहर वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशात न्हाऊन निघाले.
गडावरील राज सदरेवर व्याख्याते सुनील लाड यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात झाला. लाड यांनी छत्रपती शिवरायांच्या विविध पराक्रम आणि कार्याचा लेखाजोखा व्याख्यानात मांडला. यावेळी कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.