ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवार अपघात प्रकरण: गुन्हा दाखल करण्याची मागणी ; पवार परिवार आक्रमक !

बारामती : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर पवार कुटुंबाने प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी करत, संबंधित कंपन्या आणि अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या मागणीला अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार यांनीही पाठिंबा दिला आहे.

दोघेही बारामती पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी गेले, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यानंतर रोहित पवार आक्रमक झाले असून, त्यांनी DGCA, सीआयडी, आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयावर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्याचा आरोप आहे की VSR कंपनीला वाचवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अपघाताच्या दिवशी युगेंद्र पवार म्हणाले की त्यांनी घटनास्थळी पोहोचून विमान पूर्णपणे जळून खाक झालेले पाहिले. यामुळे त्यांनी आणि रोहित पवार यांनी बारामतीत औपचारिक तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, न्यायालयीन पातळीवरही प्रकरण हळूहळू पुढे जात आहे. केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सीआयडीकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी केली आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या या अपघातात अजित पवारसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील शोककळा आणि याप्रकरणी वाढलेल्या गोंधळामुळे नागरिक व पक्षीय नेत्यांमध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!