सोलापूर : वृत्तसंस्था
मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक वर्षांपासून या नगरपंचायतीवर राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर स्थानिक राजकारणात मोठे बदल झाले. १७ जागा बिनविरोध होऊन त्यांची ताकद पुन्हा दिसून आली. मात्र, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा वाद उभा राहिला.
नगराध्यक्षपदासाठी पाटलांच्या सुनेस उमेदवारी देण्यात आली होती. त्याचवेळी अजित पवार गटाकडून उज्वला थिटे यांना उमेदवारी मिळाली. उमेदवारीनंतर गावात दडपशाही, धमकी आणि राजकीय दबाव यांसारख्या चर्चांना उधाण आले. या दरम्यान तांत्रिक कारण दाखवत उज्वला थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला. थिटे यांनी हा निर्णय न्यायालयात आव्हान दिले, परंतु न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर हा मुद्दा सोलापूरच्या वडाळा भागातील कार्यक्रमात गाजला. त्या कार्यक्रमात अजित पवार यांनी उज्वला थिटे यांचा सत्कार करून त्यांना मजबूत पाठबळ दिले. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता, राजन पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, दमदाटी करून काही चालत नाही, प्रत्येकाचा फुगा एके दिवशी फुटतो, मस्ती दाखवणाऱ्यांना लोक खड्यासारखे बाजूला फेकतात, अशा कठोर शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
अजित पवार यांनी महिलांच्या राजकीय सहभागावर भर देत लाडकी बहिणी योजना आणि महिलांच्या सक्षमीकरणाबद्दलही भाष्य केले. पुढील निवडणुकीत योग्य व्यक्तींना संधी द्यावी, जुन्यांचा अनुभव घ्यावा आणि नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.या सर्व घटनाक्रमामुळे अनगर नगरपंचायतीत तणाव वाढला असून स्थानिक राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.