मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुक तोंडावर आली असतांना सध्या राज्यातील महायुतीमधील अजित पवार गटामध्ये राजकील हालचाली वाढू लागल्या आहे. नेत्यांच्या गाठीभेटी, दौरे वाढल्या असून अनेक पक्षातील इच्छुक नेते उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. एका मोठ्या नेत्याने मंगळवारी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समेार आली होती. सुप्रिया सुळे यांच्या गाडीत बसून जाताना त्या व्यक्तीने आपला चेहरा लपवला होता. चेहरा लपवलेला हा व्यक्ती सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर एक व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या गाडीत बसून जाताना आपला चेहरा लपवत असल्याचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडिया व्हायरल झाला होता. आपला चेहरा कॅमेरात दिसू नये, यासाठी या व्यक्तीने चेहरा फाईलच्या आड लपवला होता. या व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती राजेंद्र शिंगणे असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. आमदार राजेंद्र शिंगणे अजित पवार गटात आहेत. राजेंद्र शिंगणे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. नुकतीच त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुलाखत दिली होती. आमदार राजेंद्र शिंगणे यांनी तुतारी हाती घेतल्यास अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचा एक-एक शिलेदार त्यांना सोडून जात आहे. मागील आठवड्यात पिंपरी चिंचवडचे माजी आमदार आणि अजित पवार समर्थक विलास लांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर विलास लांडे तुतारी हाती घेणार अशी घोषणा विक्रांत लांडे यांनी केली होती. विलास लांडे यांच्यासोबत माढ्याचे आमदार बबन शिंदे हे देखील शरद पवारंची भेट घेण्यासाठी गेले होते. तर अलिकडेच फलटण येथील आमदार दीपक चव्हाण आणि विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती होती. या सर्व घडामोडी पाहता मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाला गळती लागत असल्याचे दिसून येत आहे.