पुणे : वृत्तसंस्था
देशात आगामी लोकसभा निवडणूक येण्यापुर्वीच राज्यातील राजकीय नेत्यामध्ये एकमेकाविरोधात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत बारमतीत माझा उमेदवार देणार आहे, बारामतीकर असा विचार मनात आणतील की विधानसभेला अजित पवारांना मत देऊ आणि लोकसभेला तिकडे मत देऊ, असे अजिबात चालणार नाही, मला मत द्यायचे असेल तर लोकसभा आणि विधानसभेलाही मलाच मत द्या, असे रोखठोक मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. उद्या खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर जर आमचा खासदार पराभूत झाला तर आमदारकीच्या बाबतीत मी वेगळा विचार करेन, मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही, असे सांगत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीका केली.
आपल्या काकाच्या मृ्त्यूची वाट बघतोय, हे राजकारण आहे का अजित पवार? भावनिक आवाहन करतील, ही शेवटची निवडणूक असेल. काय माहीत शेवटची निवडणूक कधी असेल? शरद पवार आहेत ते अजरामर राहतील, त्यांचे योगदान अजरामर असणार आहे हे विसरू नका. आज अजित पवारांनी सगळी हद्दच ओलांडली, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.
अजित पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांत प्रचंड कष्ट केल्यानंतर जर माझ्या शब्दाला साथ मिळाली नाही तर मी तरी हे सगळे कशासाठी करू. मी हाच वेळ माझ्या व्यवसायासाठी देऊ केला तर मी हेलिकॉप्टर विमानातून फिरेल. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मी व्यवसाय पाहिला तर माझा दावा आहे, मी जे काम करतो ते कोणीच करू शकत नाही. कोणी कितीही दावा केला तरी, कदाचित कोणी डोळ्यात पाणी आणतील, तर तुम्ही सावध रहा. भावनिक करतील पण काम करू शकणार नाही. बारामतीकरांना ठरवायचे आहे, कामाच्या पाठीशी उभे राहायचे की भावनिक मुद्याला पाठिंबा द्यायचा आहे, असेही अजित पवार यांनी या वेळी बोलताना सांगितले.