उद्या मतदान ;अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; यंदा १ हजार ६६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२६ : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी यंदा १ हजार ६६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.यासाठीची प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमर झालटे व सहाय्यक निवडणूक अधिकारी सिद्धेश्वर कुंभार यांनी दिली.यासाठी शुक्रवारी (उद्या) सकाळी ८ ते ५ या वेळेत मतदान पार पडणार आहे.एकूण सहा केंद्र असून यावर ७० कर्मचारी तसेच प्रत्येक केंद्रावर पाच पोलीस, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक असे जवळपास एकूण १२० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत,असेही म्हणाले.अक्कलकोट,हन्नुर, वागदरी,जेऊर आणि तडवळ या ठिकाणी मतदान केंद्र असणार आहेत.सहकारी संस्था गटात
७४८ ,ग्रामपंचायत गटातून ७०७, हमाल
व तोलार गटातून ६९, व्यापारी मतदारसंघातून १३८ अशा मतदारांचा समावेश आहे. अक्कलकोट बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ५९ सहकारी संस्था तसेच ७८ ग्रामपंचायती येतात.या ठिकाणी १८ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.मतदान पार पडल्यानंतर येत्या (रविवारी) सायंकाळी ५ वाजता अक्कलकोट येथे मतमोजणी होईल, अशी माहितीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
संवेदनशील मतदान केंद्रावर
पोलिसांची नजर
अनेक दिवसानंतर अक्कलकोट तालुक्यामध्ये दोन्ही बाजार समितीच्या निवडणुका लागल्या आहेत.या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून देखील या सर्व घटना घडामोडींवर करडी नजर राहणार आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजेंद्रसिंह गौर यांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. संवेदनशील गावे आणि मतदान केंद्रावर पोलिसांची विशेष नजर असणार आहे.