अक्कलकोट- उमरगा मार्गावर अक्कलकोट आगाराच्या गाड्या बंद प्रवाशांची प्रचंड गैरसोय, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
अक्कलकोट, दि.२ : गेल्या अनेक दिवसांपासून अक्कलकोट- उमरगा मार्गावरील अक्कलकोट आगाराच्या बसेस बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.या गाड्या तात्काळ सुरू करावेत,अशी मागणी राष्ट्रवादीकाँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे यांनी आगारप्रमुखांकडे केली आहे. कोरोना महामारीच्या पूर्वी या मार्गावर अक्कलकोट आगाराच्या गाड्या सुरू होत्या त्यानंतर एसटीचा संप सुरू झाला त्यानंतर तरी गाड्या सुरू करणे गरजेचे होते मात्र अक्कलकोट आगाराने गाड्या कमी असल्याच्या कारणाने त्या सुरू केल्या नाहीत.उत्पन्नाच्या बाबतीत ए प्लस मार्ग असताना याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे उत्पन्न बुडत आहे.तर दुसरीकडे उमरगा आगाराने मात्र तीन ते चार गाड्या सोडल्या आहेत तरीही त्या अपुऱ्या पडत आहेत. प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे अक्कलकोट आगाराच्या गाड्या सोडल्या शिवाय गर्दी कमी होणार नाही,अशी परिस्थिती आहे.
आलूर,केसरजवळगा,बेळंब,मुरूम,भुरीकवठे,बोळेगाव, वागदरी, शिरवळ,सांगवी,दाळींब या ठिकाणाहून येण्या जाणाऱ्यांना सध्या गाड्या वेळेवर नाहीत.यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.याबाबत विचारणा केली असता गाड्यांची कमतरता आहे असे सांगितले जात आहे परंतु ज्या मार्गावर गाड्यांचे उत्पन्न कमी आहे त्या मार्गाच्या गाड्या वळवून किंवा त्या ठिकाणच्या फेर्या कमी करून या गाड्या ए वन प्लस असलेल्या मार्गावर सोडता येऊ शकतात,असा पर्याय आगाराकडे आहे परंतु आगार प्रमुखांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे,असा आरोप प्रवाशांनी केला आहे.याकडे विभाग नियंत्रकांनी लक्ष द्यावे.या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष बनसोडे यांनी वाहतूक नियंत्रक घाडगे यांना निवेदन दिले असून तात्काळ यावर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.दोन दिवसात गाड्या सुरू करा अन्यथा तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.