अक्कलकोट, दि.७ : अक्कलकोट नवीन
बसस्थानका संदर्भात आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीमध्ये बस स्थानक उभारण्याच्या कामात येत असलेल्या अडचणी आणि रखडलेल्या निधीबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आणि मंजूर निधी मिळवण्याबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्या समवेत तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी २६ जून रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना बैठकीसाठी निवेदन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला विभाग नियंत्रक विलास राठोड, स्थापत्य अभियंता स्वामी ,प्रांताधिकारी सुप्रिया डांगे,तहसीलदार अंजली मरोड, मुख्याधिकारी सचिन पाटील,
अक्कलकोटचे आगार प्रमुख रमेश म्हंता, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे आदी उपस्थित होते.या बैठकीमध्ये सिद्धे यांनी नवीन होणारे जे बस स्थानक आहे या बसस्थानकाच्या बांधकामात काही सुधारणा करण्याचे मत व्यक्त केले आणि काही सूचना त्यांनी केल्या त्या सूचनांचा समावेश आराखड्यात करून सुधारित प्रस्ताव तयार करून त्याप्रमाणे नवीन बस स्थानक उभा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत दिल्या आहेत.अक्कलकोट बस स्थानकसाठी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५ कोटी ९० लाख रुपये मंजूर केले आहेत परंतु मंजूर निधी अद्याप मिळताना दिसत नाही त्यावेळी सरकारने एकूण १९ बस स्थानकासाठी शंभर कोटीचा आराखडा मंजूर करण्यात केला होता.त्यातील
काही बसस्थानकाचे काम पूर्ण झाले काही रखडले.रखडलेल्या बस स्थानकामध्ये अक्कलकोटचा समावेश आहे.या रखडलेल्या निधीसाठी पाठपुरावा करण्याबरोबरच अत्याधुनिक स्वरूपात
हे बसस्थानक बांधण्यातबाबत महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आल्याचे सिद्धे यांनी सांगितले.या बस स्थानकाला निधी मिळण्यासाठी आपण लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नवीन बस स्थानक बांधकाम करतेवेळी काही बदल सुचवले आहेत त्याचे पत्र आपण जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहे.हे पत्र वाचून जिल्ह्याधिकाऱ्यांनीही सूचना चांगली असल्याचे सांगितले.युती सरकार गेल्यानंतर प्रथमच बस स्थानकाच्या संदर्भात अधिकाऱ्यांच्या पातळीवरती ही बैठक पार पडली. त्यामुळे बसस्थानकाचे काम मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.