ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये आता व्यापारी आणि नोकरांनाही कोरोना टेस्ट बंधनकारक, व्यापारी महासंघाच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांची सूचना

अक्कलकोट, दि.१ : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने आता सर्वच पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये सर्व व्यापारी आणि नोकरदारांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. यासंदर्भात अक्कलकोट नगरपालिकेत मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी बैठक घेऊन व्यापार्‍यांना माहिती दिली आहे. शहरासह ग्रामीण भागातील लोक या ना त्या कारणामुळे थेट व्यापाऱ्यांच्या आणि त्यांच्या लोकांच्या संपर्कात
येतात किंवा बाहेरच्या माणसामुळे त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे सगळीकडे
संसर्ग होण्याची भीती दाट आहे.यासाठी त्यांना टेस्ट सक्तीची करण्यात आली असून याबाबतच्या सूचना देण्यासाठी बुधवारी नगरपालिकेत बैठक पार पडली.
या बैठकीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे,उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते,सचिव नितीन पाटील,राजू हिप्परगी,सचिन कुलकर्णी, गजानन पाटील,दिनेश पटेल,चंद्रकांत वेदपाठक, रामेश्वर पाटील,महिबूब शेख,आरेखक विठ्ठल तेली,मलिक बागवान,मल्लिनाथ स्वामी,भागवत सांगोलकर यांच्यासह
अन्य पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.यावेळी व्यापाऱ्यांनी प्रशासनाला काही मुद्दे निदर्शनास आणून दिले.त्यामध्ये मटन व्यावसायिक,चहा टपरीवाले,फेरीवाले,भाजी विक्रेते, पान टपरी यासह काही दुकाने सात नंतर देखील चालू राहतात.त्यामुळे एकाला एक असे न करता सरसकट सर्व छोटे-मोठे व्यापाऱ्यांची टेस्ट करून सगळ्यांना समान न्याय द्यावा व सगळ्यांना वेळ सारखी असावी,अशा प्रकारची भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली. तसेच दर शनिवारी आणि रविवारी व्यापारी पूर्णपणे दुकाने बंद ठेवतात मात्र विनाकारण रस्त्यावर लोक फिरतात यावर देखील अंकुश ठेवण्याची गरज आहे, असा मुद्दाही व्यापाऱ्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला.याकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी याकडे आपण लक्ष देऊ असे सांगितले. व्यापाऱ्यांसाठी रॅपिड
टेस्टची व्यवस्था आम्ही करणार आहोत. व्यापाऱ्यांनी ती तात्काळ करून घ्यावी आणि टेस्ट करून घेतल्याचे प्रमाणपत्र दुकानात बाळगावे,असे पाटील यांनी सांगितले. अक्कलकोटमध्ये टेस्टिंग प्रमाण
हे अत्यल्प आहे त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती जास्त आहे. म्हणून प्रशासनाने तातडीने अक्कलकोटमधील व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून यासंदर्भातील उपाय योजनांबद्दल सक्त सूचना केले आहेत तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही.त्यासंदर्भात पोलिसांशी बोलले जाईल,असेही मुख्याधिकारी पाटील यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.

व्यापाऱ्यांची भूमिका
सकारात्मक

आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत
पण प्रशासनाने देखील नियमांची अंमलबजावणी कडक करावे आणि न्याय सर्वांना समान हवा.जेणेकरून सर्वजण मिळून आपण कोरोनाला रोखू शकू.नियमांमध्ये जर ढिसाळपणा आला तर मात्र कोरोना वाढू शकतो,असा सूर बैठकीनंतर व्यापाऱ्यांमध्ये दिसून आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!