ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटचे धाडसी आणि कणखर नेतृत्व हरपले ;भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

आज दुपारी ३ वाजता कुमठे येथे होणार अंत्यसंस्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार, ज्येष्ठ भाजपा नेते आणि सहकार क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सिद्रामप्पा मलकप्पा पाटील (वय ८८) यांचे गुरुवारी रात्री सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या मूळ गावी कुमठे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री ८ वाजून १७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.वयाच्या ८८ व्या वर्षीही ते सामाजिक कार्यात सक्रिय होते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. सिद्रामप्पा पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यात भारतीय जनता पक्षाची पायाभरणी केली. कै. बाबासाहेब तानवडे यांच्या निधनानंतर भाजपला तालुक्यात बळकट करण्याची धुरा त्यांनी समर्थपणे उचलली. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणारे एक प्रामाणिक आणि सेवाभावी नेतृत्व आता काळाच्या पडद्याआड गेले, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

पाटील यांचा जन्म २५ मे १९४१ रोजी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे झाला. शेतकरी कुटुंबातील ते सुपुत्र होते. गरीबी, प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्ष यांचा सामना करत त्यांनी सामाजिक कार्यातून आपली वाटचाल सुरू केली. खेड्यापाड्यातील जनतेवर होणारे अन्याय, भ्रष्टाचार आणि योजनांपासून वंचित राहणाऱ्या गरीबांचा प्रश्न त्यांनी तरुण वयातच ओळखला आणि त्यावर लढा देण्याचा निर्धार केला.

त्यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायतीपासून सुरू झाली. १९६२ मध्ये कुमठे (गट ग्रामपंचायत कोर्सेगाव) सरपंच म्हणून त्यांनी १५ वर्षे काम केले. त्यानंतर १९७२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रवेश केला आणि तब्बल ३० वर्षे जनतेचा प्रतिनिधी म्हणून कार्य केले. शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी त्यांचा ३५ वर्षांचा संबंध राहिला. बँकेचे संचालक आणि नंतर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या पतपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. साखर उद्योगात त्यांनी निर्णायक भूमिका निभावली. श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून केवळ ११ महिन्यांत कारखान्याची उभारणी पूर्ण केली आणि पहिल्याच हंगामात विक्रमी उत्पादन करीत देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळविला.

कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्यांनी दीर्घकाळ संचालक आणि सभापती म्हणून काम केले. १९८२ ते १९८७ दरम्यान बाजारपेठ शहराजवळ स्थलांतरित करून शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज सुविधा निर्माण केल्या. २०२३ मध्ये त्यांची पुन्हा सभापती म्हणून निवड झाली होती. शेवटच्या दिवसापर्यंत ते
या पदावर कार्यरत होते.

राजकीय आयुष्याच्या सुरुवातीला ते काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. मात्र नंतर अक्कलकोट तालुक्याचा विकास आणि सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा या हेतूने त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. त्यानंतर अक्कलकोट तालुक्यात भाजपची घडी मजबूत करत पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती आणि सहकारी संस्था या सर्व पातळ्यांवर भगवा फडकाविला.

१९९२ ते १९९७ दरम्यान ते पंचायत समितीचे सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात लक्षणीय कामे झाली. शेतकऱ्यांचा पिंड असलेल्या पाटील यांनी भिमा, सिना, हरणा आणि बोरी नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची सुविधा मिळावी म्हणून मोठा प्रयत्न केला. त्यांच्या पुढाकाराने जिल्हा बँकेकडून पाइपलाईन प्रकल्पांना पतपुरवठा मिळून तालुक्यात हरितक्रांती घडविली.

त्यांचा राजकीय प्रवास संघर्षमय होता. कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी आणि सामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेकवेळा प्राणघातक हल्ल्यांनाही तोंड दिले. तरीही ते जनसेवेत कायम ठाम राहिले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि निर्भीड भूमिकेमुळे ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते.

२००९ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या विश्वासाने त्यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळविला. त्यांच्या विजयाने तालुक्यात भाजपला नवी दिशा मिळाली. त्यांनी आमदारपदाच्या काळात तालुक्यातील पायाभूत सुविधा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामे केली.

त्यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुका राजकीयदृष्ट्या सक्षम बनला. त्यांनी संघटनशक्ती, सहकारभाव आणि सर्वसमावेशक विकास यावर भर दिला. कार्यकर्त्यांशी त्यांनी कौटुंबिक नाते जपले. शिस्तबद्ध, मनमिळाऊ आणि सौम्य स्वभावामुळे ते सर्व पक्षीयांमध्ये आदरास पात्र ठरले. गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक होते. मुंडे यांच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्या कार्यपद्धतीत स्पष्टपणे दिसत असे. संघटन आणि विकास यांचा सुंदर संगम साधत त्यांनी अक्कलकोट तालुक्यात राजकीय परिवर्तन घडवले.

सिद्रामप्पा पाटील यांचे आयुष्य म्हणजे संघर्ष, सहकार आणि जनसेवेची अखंड गाथा होती. ग्रामविकासापासून ते विधानसभा पातळीपर्यंत त्यांनी अक्कलकोट तालुक्याच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्या जाण्याने अक्कलकोट तालुक्यातील राजकारणातील एक सुवर्णकाल संपला आहे,अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया :-

मार्गदर्शक नेतृत्व हरपले

तालुक्यात माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची ओळख पोलादी  पुरुष म्हणूनच होती.तालुक्याच्या राजकारणात त्यांनी अर्ध शतक हुकुमत गाजविले.अनेक पदे त्यांनी भूषविले.त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे झाली.भाजप वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.एक मार्गदर्शक नेता आमच्यातून हरपलेला आहे.

सचिन कल्याणशेट्टी,आमदार

कणखर आणि वादळी व्यक्तिमत्व पडद्याआड

सिद्रामप्पा पाटील हे एक वादळी व्यक्तिमत्त्व होते.कणखर आणि धाडसी नेतृत्व हरपले आहे.राजकारणामध्ये त्यांनी एकदा निर्णय घेतला की ते कधीही बदल करत नव्हते.त्यामुळे अनेक वेळा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.परंतु मागे हटले नाहीत. सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा दबादबा होता.त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे.राजकारण व सहकार क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे

सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार

पाटील यांच्या जाण्याने दुःख

अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार, भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच सहकार नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन झाले.या दुःख: घटनेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी हे पाटील कुटुंब्यावर कोसळलेल्या दुःखात सामील आहोत. त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो हिचं ईश्वर चरणी प्रार्थना.

  जनमेजयराजे भोसले,संस्थापक अध्यक्ष स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ

जे ओठात तेच पोटात ठेवणारे नेते

सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व होते.जे ओठात आहे तेच पोटात असणारे नेतृत्व म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती.कधीही तोंडावर स्पष्टपणे बोलणारे धाडसी नेतृत्व आमच्यातून निघून गेल्यामुळे राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. माझा आणि त्यांचा गेल्या २५ ते ३० वर्षांचा संबध होता.

दिलीप सिद्धे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष

परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या नेता

राजकारणात कसलीही परिस्थिती निर्माण झाली तरी कधीही मागे न हटणारा नेता म्हणून त्यांना आम्ही जवळून पाहिले आहे आणि तालुक्यातील सर्व सत्ता स्थाने त्यांनी
एकेकाळी आपल्या ताब्यात ठेवली होती असे ते तालुक्यात एकमेव नेते होते. विशेष म्हणजे सर्व पदावर त्यांनी यशस्वीपणे कारभार केला आहे.राजकारणात त्यांचा मोठा हातखंडा होता.शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी त्यांनी मोठे काम केले होते.

बाळासाहेब मोरे,विरोधी पक्षनेते पंचायत समिती अक्कलकोट

वडिलांना सभापती करण्यामध्ये वाटा

सर्वात जुने जाणकार नेते ते होते. तालुक्याची प्रत्येक गावची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे असायची आणि त्यांचे प्रत्येक गावात प्रामाणिक,निष्ठावान कट्टर कार्यकर्ते होते.
त्यांना त्या पद्धतीने त्यांनी सांभाळले होते. माझ्या वडिलांना सभापती करण्यामध्ये महत्वाचा वाटा होता.माझ्या आजोबांबरोबर सुद्धा अगदी मुलासारखे त्यांचे नाते होते.

  • मल्लिकार्जुन पाटील,काँग्रेस तालुकाध्यक्ष

तालुक्यातील सिंह हरपला

तालुक्यातील एक सिंह गेला असे म्हणायला हरकत नाही.कारण शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अफाट काम केले होते.एक धर्म निरपेक्ष माणूस म्हणून आमच्या समाजामध्ये देखील त्यांना आदराचे स्थान होते.माझे त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते.

 – अशपाक बळोरगी,माजी नगराध्यक्ष

पितृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले

आमच्या वडिलांसमान ते आम्हाला होते. भरमशेट्टी परिवार आणि पाटील परिवाराचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत. माझे बंधू स्व.काशीनाथ भरमशेट्टी आणि त्यांचे तर खूप जवळचे संबंध होते.भरमशेट्टी परिवाराचे आधारवड गेले.आमच्या सुख दुःखात ते नेहमी असायचे.एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले.

विश्वनाथ भरमशेट्टी,उपाध्यक्ष स्वामी समर्थ कारखाना 

कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारा नेता 

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते.भाजपला संघर्षाच्या काळात त्यांच्या माध्यमातून एक चांगला नेता लाभला होता. तानवडे परिवार आणि पाटील परिवार अनेक दिवस एकत्रपणे काम केले.आमचे काका स्व. दत्ता तानवडे यांचे  ते घनिष्ट मित्र होते.अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेते म्हणून ओळख होती.

आनंद तानवडे,माजी जिल्हा परिषद सदस्य

 

जिद्दी नेता निघून गेला

कोणतेही काम हातात धरले की शेवटपर्यंत घेऊन जाणार नेता होता. एकदा विश्वास ठेवला की कधीही मनात शंका न घेणारा नेता. माझ्यावर अनेकदा विश्वास दाखवून त्यांनी
मला सहकारातली अनेक पदे दिली. त्यांच्यामुळेच कारखान्याचे उपाध्यक्षपद तसेच इतर पद मला मिळू शकली.सामान्य कार्यकर्त्यांना एक उंची प्राप्त करून देणारा एक सच्चा आणि जिद्दी नेता हरपला आहे.

आप्पासाहेब पाटील,उपसभापती अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!