ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट नगरपरिषद : नगराध्यक्षपदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ७६ उमेदवार रिंगणात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी माघार प्रक्रियेनंतर अंतिम चित्र समोर आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल सहा उमेदवार तर नगरसेवक पदाच्या २५ जागांसाठी ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. विशेष म्हणजे, एकाही प्रभागात बिनविरोध निवडणूक झाली नाही. शेवटच्या दिवशी एकूण १६ जणांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणात बदलले.

माघार घेणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे तीन, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि तब्बल अकरा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या सैपन कोरबू, कौसर नदाफ, निलेश लवटे व उबाठा येथील स्वामीराम मोरे यांनी माघार घेतली. राष्ट्रवादीकडून शंकर पाटील यांनी तर अपक्षांमध्ये मुजाईद बागवान, पूनम गायकवाड, प्रियंका कामनूरकर, वैशाली पाटील, युगंधरा हरवाळकर, रामेश्वर पाटील, वैष्णवी धनशेट्टी, प्रमिला मडीखांबे, मजहर मुजावर आणि संदीप मडीखांबे यांनी
उमेदवारी मागे घेतली.

दरम्यान, नगराध्यक्ष पदाकरिता दाखल झालेल्या ११ अर्जांपैकी ४ अर्ज अवैध ठरले होते. उर्वरित ७ अर्जांना वैधता देण्यात आली होती. मात्र माघारीमुळे अपक्ष अश्पाक
बळोरगी यांचा एक अर्ज कमी झाला असून सहा उमेदवारांमधील चुरस अधिक तीव्र झाली आहे. काँग्रेसचे प्रमुख उमेदवार म्हणून मात्र ते निवडणूक रिंगणात आहेत. नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या १७५ अर्जांपैकी १०२ अर्ज वैध, तर तब्बल ७३ अर्ज अवैध ठरले होते. शुक्रवारी झालेल्या माघारीनंतर निवडणूक कार्यालय परिसरात मोठी गर्दी आणि हालचाल जाणवत होती. सर्वच प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार माघारीसाठी धावपळ करताना दिसून आले.

नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात भाजपचे मिलन कल्याणशेट्टी, काँग्रेसचे अशपाक बळोरगी, शरदचंद्र पवार गटाचे इकरार शेख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाबासाहेब जाधव, शिवसेनेचे रईस टिनवाला आणि अपक्ष नागनाथ उमदी यांच्यात चुरस रंगणार आहे. या सहा उमेदवारांची मतदारांवरील पकड, स्थानिक पातळीवरील संघटनशक्ती आणि प्रचारातील रणनीती हा निवडणुकीचा निर्णायक मुद्दा ठरणार आहे.

अक्कलकोटमधील या निवडणुकीत कोणताही उमेदवार बिनविरोध होऊ शकला नाही. काही प्रभागांमध्ये प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली असली तरी प्रतिस्पर्धी पक्षांचा उमेदवार रिंगणात असल्याने बिनविरोधाची शक्यता पूर्णत: फोल ठरली. यंदाची निवडणूक भाजप-शिंदे शिवसेना आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांत थेट लढतीत रंगणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील स्पर्धा अधिक चुरशीची होणार असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

उद्यापासून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू होण्याची चिन्हे आहेत. पोस्टर, बॅनर्स, जनसंपर्क, कोपरा सभा या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व पक्षांची मोहीम वेग घेणार आहे. अक्कलकोटमधील ही निवडणूक निर्णायक ठरणार असून पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण तापणार हे निश्चित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!