ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट नगरपालिकेची उद्यापासून मूर्ती दान संकल्पना, नागरिकांनी पुढे यावे, मुख्याधिकारी पाटील यांचे आवाहन

अक्कलकोट, दि.१४ : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने अक्कलकोट नगरपालिकेने ठोस पाऊल उचलले असून पाचव्या दिवसापासून म्हणजे आजपासूनच मूर्ती दान करण्याची संकल्पना राबवली आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी आपली विसर्जनाची मूर्ती नगरपालिकेकडे दान करावी, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच अन्य प्रकारच्या मुर्त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे.  ही बाब लक्षात घेऊन अक्कलकोट नगरपालिकेने यापूर्वी असा उपक्रम राबवला होता तो यशस्वी देखील झाला होता. त्यामुळे हत्ती तलाव किंवा इकडे तिकडे मूर्तीचे विसर्जन न करता घरगुती व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती या प्रियदर्शनी मंगल कार्यालयाकडे आणून जमा करावेत. त्याठिकाणी अक्कलकोट नगरपरिषदेची टीम तैनात आहे. त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या मुर्त्या जमा झाल्यानंतर अक्कलकोट नगरपालिका एकत्रितपणे शासन नियमाप्रमाणे या मूर्ती विसर्जित करेल, अशी माहितीही त्यांनी दिली. या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे, अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरवासीयांनी केले स्वागत

दीड वर्षापूर्वी मुख्याधिकारी आशा राऊत यांनी मूर्ती दान ही संकल्पना यशस्वी राबविली होती. त्याला शहरवासीयांनी सहकार्य केले होते. त्याच धर्तीवर हा निर्णय मुख्याधिकारी पाटील यांनी राबवला आहे त्यांच्या उपक्रमाचे शहरवासीयातून स्वागत होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!