ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट सिटी सर्व्हे कार्यालयाचा अनागोंदी कारभार

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- अक्कलकोट तालुक्यातील भुमी अभिलेख कार्यालयात सध्या भोंगळ कारभार सुरू असल्याने त्याचा नाहक त्रास जनतेला सहन करावा लागत असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे व्यक्त केले आहे. भुमी अभिलेख कार्यालयाच्या हद्दीतील अक्कलकोट शहरामध्ये गेल्या चार पाच वर्षांत बांधकाम व्यावसायिक यांनी फ्लॅट बांधून विक्री केली असून सदर फ्लॅटचे नोंदी करण्यास भुमी अभिलेख कार्यालयात गेल्या तीन वर्षांपासून सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन देखील आजतागायत त्यांची नोंद केली नसल्याने बांधकाम व्यावसायिक व फ्लॅट धारकांमध्ये भांडण तंटे होत आहेत. पंधरा वीस लाख रुपये देऊन फ्लॅट खरेदी घेऊनही आपल्या नावावर उतारा मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. याबाबत अनेक वेळा भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटले असता तेथील अधिकाऱ्यांनी अक्कलकोट शहराला अपार्टमेंट अॅक्ट लागू नसल्याने नोंद धरता येत नाही असे सांगतात. एकीकडे दुय्यम निबंधक कार्यालयात फ्लॅटचे विक्री व खरेदी करण्यात कोणतीही अडचण येत नाही तसेच अक्कलकोट नगरपरिषदेचे रितसर बांधकाम परवाना, बांधकाम पुर्ण झाल्याचा दाखला तसेच नगरपरिषदेचा वापर परवाना इत्यादी सर्व कागदपत्रे जोडलेले असताना कोणत्या आधारावर नोंद धरता येत नाही. जर अपार्टमेंट अॅक्ट अक्कलकोट शहराला लागूच नसेल तर नगरपरिषदने बांधकामास परवानगी कशी दिली व दुय्यम निबंधक कार्यालयाने खरेदी विक्री करण्यास परवानगी कशी दिली. याबाबत असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. तरी मा. जिल्हाधिकारी साहेब तुम्ही या गोष्टी वर जातीने लक्ष घालून फ्लॅट नोंद करुन ग्राहकांना न्याय मिळवून द्यावे. तसेच अक्कलकोट शहर व तालुक्यातील अनेत शेतकरी तसेच जागेच्या मालकांचे मोजणींचे प्रकरण दोन तीन वर्षे झाली अद्यापही त्याना मोजणीची तारखा मिळत नसून जर तारीख मिळाली तर भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांचे प्रत्यक्ष जागेवर मोजणीस आले असता मोजणी करण्यास अडचण आहे म्हणून मशिनला रेंज दिसत नाही किंवा गटाच्या चारही बाजूला असलेले झाडे झुडपे तोडून साफ करून झाल्यावरच मोजणी होईल असे सांगून मोजणी पुढे ढकलतात. एकीकडे सरकार झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत असताना दुसरीकडे शासनाच्या भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाची एकप्रकारे चेष्टा करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ मोठे झाडे आहेत. ते मोजणीसाठी तोडायला सांगणे म्हणजे अधिकारी वर्गांची मनमानी असल्याचे दिसून येत आहे. एकतर शेतकरी कोरोनाच्या अतीसंकटात असताना मोजणीची फी भरुन देखील मोजणींचे काम होत नसेल तर किती अन्याय होत आहे. भुमी अभिलेख कार्यालयात याबाबत विचारणा केली असता आमच्या कडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे आम्हाला पण काय करता येत नाही असे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तरी यासर्व बाबतीत आपण आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक्षक जिल्हा भुमी अभिलेख यांच्या सह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे भुमी अभिलेख कार्यालयप्रमुख यांची बैठक लावून शेतकरी व सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे जर येत्या आठ दिवसांत यावरती कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी दिसून न आल्यास राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्व भुमी अभिलेख कार्यालयासमोर शेतकरी व सर्व सामान्य जनतेला घेऊन तीव्र उग्र आंदोलन करण्यात येईल ,अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!