मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट
तालुक्यात मागील दोन दिवसात अवकाळी
व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिले आहेत.
सोमवारी,यासंदर्भात मंडल अधिकारी आणि तलाठ्यांची त्यांनी बैठक घेतली.या बैठकीमध्ये पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.रविवारी,आमदार सचिन कल्याणशेट्टी व तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी तालुक्यातील विविध भागाची पाहणी केली होती.यानंतर बैठक होणार असल्याचे जाहीर केले होते.त्यानुसार अक्कलकोट तहसील कार्यालयमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले
आहे त्या ठिकाणचे मंडल अधिकारी तलाठी व कोतवाल यांना सूचना देण्यात आल्या.तालुक्यातील संगोगी आ,तोरणी,जेऊर ,जेऊरवाडी या भागातील फळ पिकांचे व शेती पिकांचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले होते.या पाहणीत द्राक्ष बाग ,केळी, पपई ,टोमॅटो ,टरबूज या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे जेऊर भागात दिसून आले. संगोळी आ,तोरणी, बोरोटी या भागांमध्ये ही अंशतः नुकसान झाल्याचे दिसुन आले होते. तलाठी मंडळ अधिकारी,कृषीचे कर्मचारी यांना आदेश करण्यात आले असून आता संबंधित नुकसानीबाबतचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात येईल,
अशी माहिती त्यांनी दिली.
संप मिटल्याने
अडथळा दूर
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने आता पंचनाम्यातील अडथळा जो आहे तो दूर झाला आहे.मागच्या चार-पाच दिवसांपासून हा संप सुरू असल्याने पंचनामे होणार की नाही.याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका होती मात्र सोमवारी हा संप मिटल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.