अक्कलकोट, दि.१७ : महाराष्ट्र राज्य
ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांना बँकेमार्फत ७ कोटी रकमेचे कर्जाचे वितरण आमदार सचिन कल्याणशेट्टी व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि अमृत महा आवाज अभियान तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा देखील पार पडला.अमोल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर ,गटविकास अधिकारी सचिन खुडे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रशांत नाशिककर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर निशांत जयस्वाल, तालुका आरोग्य अधिकारी अश्विन करजखेडे, सचिन चवरे आदिंसह प्रभाग संघाचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील समूहांचे महिला प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैला केशवदास यांनी केले.या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र ,बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया व विदर्भ कोकण ग्रामीण बँक या सर्वांनी १७० समूहांना ७ कोटी रकमेचे धनादेश व मंजुरी पत्र प्रदान केले . या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या बँक सखी व प्रभाग समन्वयक यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच अमृत महा आवास अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे तसेच रमाई आवास योजनेचे
उत्कृष्ट घरकुल बांधकाम केलेल्या लाभार्थी, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन
गौरविण्यात आले.यावेळी बोलताना
आमदार कल्याणशेट्टी यांनी महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने कार्यवाही करावी जेणेकरून एकट्या महिलेचा नव्हे तर संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असे सुचवले. राज्य शासनाच्या शासन आपले दारी अभियान अंतर्गत आता पंचायत समिती प्रशासन आणि बँका ही बचत गटांच्या दारी येऊन जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्यासाठी सहकार्य करत आहेत, त्याचा लाभ घ्यावा आणि सक्षम बनावे असे अमोल जाधव यांनी सांगितले. बचत गटांनी आता पारंपारिक वस्तू बनवण्यासोबतच जास्तीत जास्त मागणी असणाऱ्या वस्तू तयार कराव्यात व सांघिक पद्धतीने विक्री करावी असे गट विकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले.
आयुषमान भव या अभियान अंतर्गत सदर कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांची आरोग्य विभाग मार्फत तपासणी करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद मोरडे यांनी केले तर सलगर प्रभागाचे अध्यक्ष शोभा माळी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री राहुल दंतकाळे ,श्री सिद्धाराम हिरेमठ , विष्णू राठोड, मल्लिनाथ कुंभार ,यशपाल गायकवाड, रेणुका उदगिरे , सोनाली नडगम व सर्व प्रभाग संघ पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.