सिंदखेड रस्त्यावरील बोगद्याप्रकरणी नितीन गडकरी यांची भेट घेणार,आता खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी करणार पाठपुरावा
अक्कलकोट, दि.२१ : उत्तर भागात सिंदखेडकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील बोगदयासाठी पुढचे पाऊल म्हणून शेतकरी व नागरिकांनी आक्रमक होत रविवारी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती दाखवली.यावेळी खासदार डॉ.जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी प्रत्यक्षात होत असलेल्या कामाची पाहणी केली.त्यानंतर हा विषय आपण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कानावर घालून तात्काळ मार्गी लावू,असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.या बोगदयासाठी गेल्या सहा महिन्यापासून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन केले आहे.त्याचा वरिष्ठ पातळीवरती पाठपुरावा देखील सुरू आहे.ही बाब आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याही निदर्शनास आणून दिलेली आहे.मुख्याधिकारी सचिन पाटील यांनाही दाखवलेली आहे.या ठिकाणी भल्यामोठ्या उंचीचा पूल होत आहे आणि या पुलाखाली अक्कलकोट नगर परिषदेची पाणीपुरवठा पाईपलाईन देखील गेलेली आहे.जर भविष्यात याठिकाणी पाईपलाईन फुटली तर मात्र याच्या देखभाल आणि दुरुस्तीचा फार मोठा प्रश्न उद्भवणार आहे.त्यामुळे या ठिकाणी मोठा बोगदा होणे अत्यंत गरजेचा आहे.याठिकाणी बोगदा झाला तर पाइपलाइनची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे अन्यथा मोठा प्रश्न याठिकाणी निर्माण होऊ शकतो.वास्तविक पाहता याठिकाणी जुना किणी रस्ता आहे. सर्वे करतानाच अधिकाऱ्यांनी चूक केली आहे,असे म्हणणे आहे. याठिकाणी बोगदा सोडणे आवश्यक होते परंतु चुकीच्या सर्वेमुळे याठिकाणी बोगदा सोडला नाही.त्यामुळे कुरनूर, चुंगी, मोट्याळ, सिंदखेड येथील शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आता खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी या भागाची पाहणी केली आणि त्यानंतर लगेचच आपण याप्रश्नी लक्ष घालून केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांची भेट घेऊन निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे त्यांनी सांगितले.यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी संजय कदम यांच्याशी आम्ही शेतकरी,नेते,पदाधिकारी वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत.परंतु ते कोणाचाही फोन घेत नाहीत. प्रतिसाद देत नाहीत हे काम जर नाही झाले तर उपोषण, रास्ता रोको यासारखे आंदोलने आम्ही ग्रामस्थांच्यावतीने करू आणि प्रशासनाला हे काम करण्यास भाग पाडू, अशा प्रकारचा इशारा तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिला आहे.यावेळी शेतकऱ्यांनी देखील खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांना शेतकऱ्यांना कशा प्रकारची अडचण येत आहे आणि पाईपलाईनला कशा प्रकारे धोका आहे हे सांगितले. यावेळी विक्रांत पिसे, बसवराज किरनळळी, सोमेश्वर किरनळळी,सुनील सिद्धे, स्वामीराव भालके,जगू पुजारी, प्रकाश छकडे, गणू बोलदे, महमूद खिस्तके, तुळजाराम यारोळे, श्रीशैल पाटील,संगणा डबरे, रमेश कामनूरकर,लक्ष्मण कोरे, आयुब शेख, जावेद कोतवाल, सचिन पवार, मुन्ना कुरणे, बाळकृष्ण गवंडी यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खराब रस्त्यासाठी
आंदोलन करणार
या रस्त्याचे काम सुरू असताना
हजारो ब्रास मुरूम हा सिंदखेड भागातून उचलण्यात आला आहे आणि याची ने-आण करत असताना सिंदखेड ते अक्कलकोट रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे.केवळ त्या वाहतुकीमुळे हा रस्ता खराब झाला आहे याची देखील ठेकेदारानी दुरुस्ती करून द्यावे, अशी देखील मागणी शेतकरी करत आहेत अन्यथा आंदोलन करण्याच्या पावित्र्यात ते दिसत आहेत.