सोलापूर : प्रतिनिधी
शहरापासून पाच ते सहा किलोमीटरवर असलेल्या बाळे गावात गेल्या आठ दिवसापासून चोरट्याने धुमाकूळ घातला असून, खंडोबा मंदिर बाळे जवळ राहणाऱ्या गणेश कोरडे या व्यक्तीच्या घरी मोठी घरफोडी झाली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश तुकाराम कोरडे यांचे खंडोबा मंदिर बाळेजवळ लॅपटॉप विक्रीचे दुकान आहे. ते दुकानात असताना घरी असलेले आई-वडील यांनी घराच्या लोखंडी दरवाजाला बाहेरून कुलूप लावून घर बंद करून अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील घरी गेले. इकडे अज्ञात चोरट्याने लोखंडी दरवाज्याच्या बाहेरील कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील तोशिबा कंपनीचा टीव्ही, रोख २ लाख ५० हजार, सोन्याचे गंठण, सोन्याचे कानातील झुबे, ठुशी, चांदीचे पैंजण, जोडवे, चेन, साड्या, पितळी घागरी असा जवळपास ४ लाख ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या घटनेचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक धायगुडे हे करीत आहेत.