तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२३ : समाजोपयोगी कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सखी ग्रुपने या वर्षीही गरीब व होतकरू लोकांसोबत दिपावली साजरी केली आहे. अक्कलकोट येथील बॅगेहळळी रोड परिसरातील फिरून विक्री करणारे, रामोशी, डवरी गोसावी इत्यादी लोकांची कुटूंबीय तंबू, राहुट्या व पाले लावून राहत आहेत. या गरीब व होतकरू लोकांना व कुटुंबियाना एकत्र करून त्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. यावेळी जमलेल्या स्त्री, पुरुष व आबालवृद्धांना वेदिका हर्डीकर व श्रद्धा मंगरुळे यांनी स्वछता व आहार विहार याबद्दल मार्गदर्शन केले.
या सर्व स्त्री पुरुषांना व्यवस्थित बसवून दिपावली फराळाचे सर्व जिन्नस व्यवस्थित वितरण करून खाऊ घालण्यात आले. या सर्व गरीब स्त्री,पुरुष मुलामुलींना दिवाळी साठी लागणारे तेल, उटणे,साबण व भेटवस्तूं देण्यात आल्या. या कुटुंबातील सर्व महिलांना व मुलींना दिवाळी भाऊबीजेची भेट म्हणून मायेची साडीचोळी भेट देण्यात आली. अक्कलकोट सखी ग्रुपने आम्हा गरीब होतकरू लोकांसोबत दिपावली साजरी करून आम्हा गरीब लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण केले आहेत, अशी भावना यावेळीया कुटुंबियांनी व्यक्त केली.
यावेळी सखी ग्रुपच्या अनिता पाटील, उषा छत्रे, श्रद्धा मंगरुळे, अश्विनी बोराळकर, रत्नमाला मचाले, वेदिका हर्डीकर, डॉ. दीपमाला आडवीतोट, प्रियंका किरनळळी, आशा भगरे, लक्ष्मी आचलेर, रोहिणी फुलारी, रेखा तोरसकर, मल्लमा पसारे, माधवी धर्मसाले, शितल जिरोळे, वर्षा शिंदे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सोनल जाजू यांनी केले. तर आभार सुवर्णा साखरे यांनी मानले.