अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) या राज्यातील अग्रगण्य व्यापार व उद्योग संघटनेच्या विधी व नियामक व्यवहार समितीच्या सह-अध्यक्षपदी मैंदर्गीचे सुपुत्र अॅड. विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील सुपुत्र असलेले अॅड. विश्वनाथ पाटील हे मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सन १९२७ मध्ये स्थापन झालेली MACCIA ही राज्यातील सर्वात जुनी आणि प्रभावी व्यापार संस्था असून उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत सरकारसोबत समन्वय साधून आर्थिक विकासासाठी कार्य करते. जवळपास शतकभराचा वारसा असलेल्या या संस्थेच्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल अॅड. पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मुंबईतील कळाघोडा, फोर्ट येथे संस्थेचे मुख्यालय असून राज्यातील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध धोरणात्मक प्रश्नांवर ही संस्था काम करते. अॅड. पाटील यांच्या नियुक्तीमुळे समितीच्या कार्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.