अक्कलकोट : वादळी वारा
आणि अवकाळी पावसामुळे अनेक
ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्याचा फटका अक्कलकोट शहराला बसला असून शहराच्या टंचाईत आणखी भर पडली आहे. यामुळे अक्कलकोट शहर व हद्दवाढ भागात पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.
वास्तविक पाहता कुरनूर धरणात मुबलक पाणी साठा असून सुद्धा केवळ विद्युत पुरवठयाअभावी पाणी पुरवठा सुरळीत होत नाही.याबाबत पालिका गांभीर्याने घ्यायला तयार नाही. परिणामी संकटाची तीव्रता वाढली आहे.
महावितरणने तत्काळ कुरनूर धरणाजवळील पंप हाऊसला वीज
न खंडित होता पुरवठा करावा कारण अनियमित वीज पुरवठयामुळे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. अक्कलकोट शहरात गेल्या दहा दिवसापासून पाण्याचा ठणठणाट आहे. विशेष म्हणजे अक्कलकोट शहराला पाणीपुरवठा करणार्या चार योजना आहेत तरीदेखील ही परिस्थिती आहे.
याबाबत ना नगरसेवक गंभीर आहेत ना प्रशासन या दोघांबद्दल ही महिलांची मोठी तक्रार असून नळाला पाणी न आल्याने महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विविध पक्षातून व सामाजिक संघटनांकडून वेळेत दखल नाही घेतली तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.