अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट येथील सी. बी. खेडगी महाविद्यालयातील इयत्ता बारावी कला शाखेचा विद्यार्थी राहुल सोमनाथ गेजगे याची महाराष्ट्र राज्य कला महोत्सव २०२३-२४ अंतर्गत राज्यस्तर सादरीकरणातून संगीत वाद्य अंतर्गत हलगी वादन या प्रकारातून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन क्षेत्रातून अक्कलकोटचा लौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढला आहे.
यानिमित्ताने चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी गेजगे याचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. एस. सी. आडवीतोट, उपप्राचार्य प्रा. बसवराज चडचण यांचीही उपस्थिती होती. २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान विविध दहा कलाप्रकारांचे राज्यस्तरीय सादरीकरण झाले होते.. महाराष्ट्रातील एकूण २३७ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी १९ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवडले गेले. यामध्ये राहुल गेजगे या अक्कलकोटच्या खेडगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हलगी वादन प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी राहुल हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.सोलापूर जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी निवड झालेला राहुल हा एकमेव विद्यार्थी आहे.९ जानेवारी ते १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालभवन नवी दिल्ली येथे ही स्पर्धा होणार आहे. या यशाबद्दल सोमनाथ गेजगे, प्रा. संजय कलशेट्टी, प्रा. श्रीमंत बुक्कानुरे, प्रा. श्रीकांत जिड्डीमनी, प्रा. निळप्पा भरमशेट्टी,प्रा. प्रकाश सुरवसे आदींनी अभिनंदन केले. यासाठी प्रा. डॉ. सोमनाथ राऊत यांनी परिश्रम घेत या विद्यार्थ्याला मार्गदर्शन आणि सहकार्य केले.