अक्कलकोटचे ट्रामा केअर रुग्णांसाठी असून अडचण नसून खळंबा
बुधवारच्या अपघातानंतर महत्त्व अधोरेखित, रुग्णांच्या नातेवाईकात संताप
तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोटमध्ये बुधवारी दुपारी ए – वन चौकामध्ये एक अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच ते सहा जण जखमी झाले.या अपघातानंतर तात्काळ
जेव्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये या रुग्णांना नेण्यात आले.त्यावेळी त्यांना मिळालेल्या असुविधा पाहता अक्कलकोटच्या ट्रामा
केअर सेंटरची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाल्याचे दिसून आले.आरोग्य विभागाचा अक्षम्य दुर्लक्षपणा अधोरेखित
होत आहे याला जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी देखील तितकेच जबाबदार आहेत,अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.दोनच दिवसांपूर्वी दैनिक संचारने अक्कलकोटच्या ट्रामा
केअर सेंटर बाबत आणि तिथे मिळणाऱ्या सुविधांबरोबर प्रश्न उपस्थित केले
होते.त्याचा प्रत्यय बुधवारी दुपारी अक्कलकोटकरांना आणि या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आला. खरे तर शासनाच्या आरोग्य विभागाने नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा
मिळावे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून अक्कलकोटचे ट्रामा केअर सेंटर मागणीच्या कित्येक वर्षानंतर उभारले गेले परंतु हे ट्रामा केअर सेंटर जर रुग्णांना उपयोगी पडत
नसेल तर त्याचा काय उपयोग,असा सवाल संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकातून उपस्थित होत आहे.ए- वन चौकामध्ये
ज्यावेळी ही घटना घडली.अगदी हाकेच्या अंतरावर हे ट्रामा केअर सेंटर आहे त्याच्या बाजूलाच ग्रामीण रुग्णालय देखील आहे परंतु
तात्पुरत्या स्वरूपातील उपचार करून ग्रामीण रुग्णालयातून हे रुग्ण सोलापूरला पाठविण्यात आले. या दोन गोष्टी आहेत एक तरी ग्रामीण रुग्णालय मध्ये सुविधा चांगल्या मिळत
नाहीत,अशी लोकांची तक्रार आहे.हा शिक्का पुसण्यासाठी रुग्णालयाने देखील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.या ठिकाणी एखादा रुग्ण जर गेला तर कोणी जबाबदारीच घेत नाही त्यामुळे रुग्णांनी रुग्णाचे नातेवाईक सुद्धा सोलापूरला जाण्याचा निर्णय घेतो ही वस्तुस्थिती आहे.जर ट्रामा केअर सेंटरमध्ये संपूर्ण स्टाफ आणि वैद्यकीय अधिकारी जागेवर असते तर ह्या रुग्णांना सोलापूरकडे नेण्याची वेळ आली नसती किंबहुना चांगले प्राथमिक उपचार तरी या जखमी रुग्णांना मिळाले
असते परंतु या रुग्णांना सोलापूरला
शिफ्ट करावे लागले.तत्पूर्वी अपघातामध्ये
एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला.अशा अनेक छोट्या मोठ्या घटना अक्कलकोट तालुक्यात घडत असतात पण त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याची ओरड रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांमधून होत आहे.ट्रामा केअर सेंटरची इमारत आणि तिथल्या
मशिनरी बघून अक्कलकोटमधील नागरिकांना
देखील आश्चर्य वाटत आहे.एकीकडे शासन नागरिकांचे चांगले राहावे याच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करते तर दुसरीकडे त्याच शासनाच्या आरोग्य खात्यात कर्मचाऱ्यांना अभावी जर रुग्णांची अशा
प्रकारे हेळसांड होत असेल तर यापेक्षा दुर्दैव कोणते असेल,अशी चर्चा आज दिवसभर अक्कलकोटमध्ये सुरू होती.
सुविधा मिळत नसल्याबद्दल खंत
अक्कलकोटमध्ये ज्यावेळी आज अपघात घडला.त्यावेळी आम्ही तिथून लगेच रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकासोबत ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो. तिथे तात्पुरते प्राथमिक उपचार झाले परंतु त्यांना जर चांगली सुविधा ट्रामा केअर सेंटरमध्ये देता आली असती परंतु तिथे कर्मचारीच नसल्याने ही सुविधा मिळू शकले नाही, याची खंत वाटते.
शबाब शेख,अक्कलकोट
चौकट :-
गतिरोधकाच्या
मागणीकडे दुर्लक्ष
ए – वन चौक हा अक्कलकोटमधील
एक महत्त्वाचा स्पॉट आहे.या ठिकाणी गतिरोधकाची खूप गरज आहे.आम्ही
वारंवार नगरपरिषदेकडे मागणी केली.पण तो
आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली. गतिरोधक राहिला असता तर कदाचित आजचा अपघात टळला असता.किमान
आता तरी नगरपरिषदेने जागे व्हावे.
सुधीर माळशेट्टी,अक्कलकोट