सोलापूर : वृत्तसंस्था
कर्नाटककडून पाणी अडवण्यात येत असल्याच्या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उजनी धरण येथून सोडण्यात आलेले पाणी भीमा नदीवरील उमराणी गावाजवळील नव्या बंधाऱ्यात रोखले जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या अडवणुकीमुळे शेकडो हेक्टर शेती धोक्यात आली असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
६ फेब्रुवारी रोजी उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे ४,४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. मात्र हे पाणी उमराणी बंधाऱ्यात अडवले गेल्याने खालील प्रवाहातील भागात पोहोचलेच नसल्याची तक्रार आहे. परिणामी लवंगी, पाटीलनगर, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर आणि चिंचपूर या गावांतील पिकांना पाण्याचा पुरवठा ठप्प झाला आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने उभ्या पिकांवर संकट ओढवले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
उमराणी येथे सुमारे एक टीएमसी पाणी रोखण्यात आल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. याचा थेट फटका महाराष्ट्रातील किमान नऊ गावांना बसत आहे. भीमा नदीचा प्रवाह खालच्या भागात पोहोचत नसल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
या पाणीटंचाईचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. मंद्रूपसह आठ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे. ग्रामस्थांना पर्यायी स्रोतांचा शोध घ्यावा लागत असून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याची तक्रार आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देत तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रश्नावर सोलापुरातील लोकप्रतिनिधीही आक्रमक झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी खाली पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
तथापि, जोपर्यंत उमराणी बंधाऱ्यातील पाणी खाली सोडले जात नाही, तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, अशी भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणात दोन्ही राज्यांनी समन्वयाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.