बारामती : वृत्तसंस्था
राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघात आज लोकसभा निवडणूक होत आहे. त्यातच या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप सुरू असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी या संदर्भात ट्वीटरवर व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची लढाईबारामतीत महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्यात लढत होत आहे. ही लढाई पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर या जागेसाठी दोन्ही गटांकडून मोठे शक्तिप्रदर्शन आणि प्रचार करण्यात आला. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
”बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस…यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत यासाठीच पाहीजे होती का ‘वाय’ दर्जाची सुरक्षा?”, अशा आशयाचे हे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. त्यांनी या ट्विटसह अनेक व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. यामध्ये पोलिसांमोरच मतदानासाठी पैसे दिले जात असल्याचे दिसून येत आहे.