अक्कलकोट : अक्कलकोटचा आमदार राष्ट्रवादीचा नसला तरी मी आपल्या प्रत्येक कामासाठी सोबत आहे,काळजी करू नका आणि यापुढे राष्ट्रवादीची ताकद वाढण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करावे, असे आवाहन मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केले. रविवारी अक्कलकोट येथे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ताच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे होते. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे म्हणाले की, आता निवडणुका जवळ आल्या आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. त्यादृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत जीव झोकून देऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करावा. तालुक्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाला मानणारा एक वर्ग मोठा आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी मागे न राहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा प्रत्येक गावात काढून ताकद वाढवावी, असे आवाहन केले.
कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार, अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्याचे कौतुक करत राष्ट्रवादी हा पक्ष सर्व दृष्टीने कामाचा असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष सिद्धाराम जाधव यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांचेही मनोगत झाले. या मेळाव्यास जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष महेश माने, दक्षिणचे तालुकाध्यक्ष बिपीन करजोळे, अक्कलकोट शहराध्यक्ष मनोज निकम, शिवराज स्वामी, महिला तालुकाध्यक्षा माया जाधव, प्रकाश सुरवसे, इस्माईल फुलारी, जयदीप साठे, शंकर व्हनमाने, माणिक बिराजदार, फरीद जमादार, संजय कोंडे, ताहीर शेख, पिंटू चव्हाण, मानव घोडके, रवी गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात स्वाभिमानी संघटनेचे सिध्दाराम जाधव यांनी कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अक्कलकोटच्या मेळाव्यानंतर जेऊर येथे माजी तालुकाध्यक्ष बंदेनवाज कोरबू यांनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यालाही सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावत आगामी निवडणुकीत तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंदेनवाज कोरबू यांनी केले.या मेळाव्यालाही कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.