मुंबई : वृत्तसंस्था
ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या सल्ल्याने ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. ओबीसी नेते राजकीय पक्ष काढत आहेत ही चांगली गोष्ट आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे. वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने सामाजिक व राजकीय मदत करायला तयार आहोत. आमचा हा सल्ला भुजबळ मान्य करतील, अशी अपेक्षा आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी केले.
राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या तापला आहे. त्यामुळे ओबीसी नेते एकत्र आले आहेत. मागील आठवड्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसींची बैठक झाली. त्यात अनेक ओबीसी नेत्यांनी आपल्या हक्काचा ओबीसींचा पक्ष स्थापन करण्याची भूमिका मांडली यासाठी १५ ओबीसी नेत्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ओबीसी समाजाची ६० ते ६५ टक्के लोकसंख्या असताना सत्तेचा वाटा दिला जात नाही. त्यामुळे आता राजकीय पक्ष स्थापन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
त्यामुळे ओबीसींचा पक्ष काढण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मागील आठवड्यात केली होती. दरम्यान, ओबीसींच्या पक्षाला मंत्री भुजबळ यांचा उघड पाठिंबा आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्यांना आवाहन करत ओबीसींचे नेतृत्व स्वतः भुजबळ यांनी करावे, यासाठी वंचित बहुजन आघाडी सामाजिक व राजकीय मदत करायला तयार आहे, अशी अनोखी ऑफरच दिली आहे. आता भुजबळ त यावर काय भूमिका घेतात हे येत्या आगामी दिवसांत स्पष्ट होईलच