ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सर्व समावेशक आणि कठीण काळातही विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची प्रतिक्रीया

मुंबई दि.8 मार्च : राज्याचा आज जाहिर झालेला 2021 चा अर्थसंकल्प कोरोना संकटाच्या कठीण परिस्थितीतही विकासाला चालना देणारा आणि राज्यातील शेती, आरोग्य, पणन, कौशल्य विकास, मत्स्य विकास, वाहतूक, जलवाहतूक, महिला विकास, प्राचीन मंदिरांचे संवर्धन त्याचप्रमाणे पर्यटन आणि कौशल्य विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रीया वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज वित्त मंत्री यांनी जाहिर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत दिलेली आहे.

या अर्थसंकल्पात कोरोनामुळे उदभवलेल्या गंभीर परिस्थितीतही अर्थकारणाचे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला असून आरोग्य सेवेच्या विकासासाठी 7,500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सातारा, सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रायगड, त्याचप्रमाणे अमरावती आणि परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावीत करण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्हयात कोविड उपचार केंद्रही निर्माण करण्यात येणार आहेत.

कोरोनामुळे खालावलेल्या अर्थव्यस्थेला सावरण्याचे काम कृषी क्षेत्राने केले आहे. कृषी क्षेत्राची या वर्षात तब्बल 11.7 टक्के वाढ झाली आहे. राज्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी विकेल ते पिकेल, कर्जमाफी, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण, प्रत्येक तालुक्यात अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका अशा माध्यमातून शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

राज्यातील दळणवळणाला चालना देणाऱ्या समृध्दी महामार्गाचा शिर्डी ते नागपूर हा भाग येत्या 1 मे पासून सुरु करण्यात येत असून मराठवाडयातील नांदेड, हिंगोली, परभणी व जालना जिल्हयाला याचा विशेष लाभ होणार आहे. याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्ग, पुणे शहरासाठी नवा रिंग रोड तसेच रेल्वे प्रकल्पांसाठीही तरतूद केलेली आहे. मुंबईतील पूर्व मुक्त मार्गासाठी पुढाकार घेवून हे काम पूर्ण करणारे विलासराव देशमुख साहेब यांचे नाव या मार्गाला देण्यात आले आहे. तसेच लातूर येथील विलासराव देशमुख विज्ञान संस्थेसाठी 73 कोटी 19 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, प्रत्येक जिल्हयात राजीव गांधी विज्ञान केंद्र, गरीबांचे दळण-वळणाचे साधन असणाऱ्या एस.टीच्या विकासासाठी भरीव तरतूद, वरळी-वांद्रे सागरी मार्ग, शिवडी न्हावाशेवा मार्ग, मुंबई मेट्रो, मुंबईतील कोस्टलरोड व नवे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे नगरविकासाला मोठी चालना मिळणार आहे.

विद्यार्थीनींना मोफत प्रवास व यासाठी 1500 नव्या हायब्रीड बसेस, महिलांच्या नावाने घर खरेदीला मुद्रांक शुल्क सवलत, महिला व बाल विकास विभागाच्या योजनांसाठी निधी, महिला अत्याचार रोखण्यासाठी जलद गती न्यायालये या योजना आजच्या महिला दिनाचे औचित्य साधून घोषित करण्यात आल्या आहेत.

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात येणाऱ्या राज्य संग्रहालयासाठी निधी, प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी तसेच शाश्वत रोजगारासाठी योजना, आश्रम शाळांचा विकास हे उपक्रमही महत्वपूर्ण आहेत.

मुंबईत राज्य नियोजन भवनाच्या उभारणीसाठी 200 कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला असून संत नामदेवांचे 750 वे जयंती वर्ष त्याचप्रमाणे मंगळवेढा येथे उभारण्यात येणाऱ्या बसवेश्वरांच्या स्मारकासाठी निधी देण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हयात आय.टी. केंद्र उभारण्यात येणार असून शेतकरी, महिला, उद्योग, स्वयंरोजगार या घटकांना केंद्रस्थानी मानण्यात आले आहे. यामुळे या वर्षीचा राज्याचा अर्थसंकल्प सर्व समावेशक असल्याचे अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!