सोलापूर : प्रतिनिधी
देशात लोकसभा निवडणूकी पूर्वीच राज्यातील कॉंग्रेस व भाजपमध्ये आता राजकारण रंगू लागले आहे. देशात सुरू असलेल्या परिस्थितीमुळे जनतेच्या मनात भाजपाविषयी तीव्र संताप निर्माण झालेला आहे. आणि काँग्रेस विषयी तितकीच विश्वासाहर्ता पुन्हा तयार होत आहे. एकीकडे भाजपला मतदार अक्षरशः वैतागला आहे आणि काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. काँग्रेस सत्ता काळात केलेला विकास समजावून सांगत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले मंगळवेढा येथे आयोजित तालका काँग्रेस कमिटी पदाधिकारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी जेष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, अॅड. अर्जुनराव पाटील, राजेद्र चेळेकर, भीमराव मोरे, अॅड. रविकिरण कोळेकर, शिवशंकर कवचाळे, इसाक शेख, नाथा ऐवळे, पांडुरंग जावळे, दादा पवार, संदीप पवार, शहाजी कांबळे, बजरंग चौगुले, आबासाहेब पाटील, नामदेव डांगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाल्या, गेल्या काही वर्षात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जो अपमान सहन करावा लागला आहे तो यापुढे होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. याशिवाय कार्यकर्त्यांनी आढावा बैठकीत जे जे प्रश्न उपस्थित केले ते सर्व प्रश्न येत्या अधिवेशनात मांडणार आहे. यावेळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे यांनीही मनोगत व्यक्त केले.