दिल्ली : देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर सुमारे 9 महिन्यांनी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांची देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) ची नियुक्ती करण्यात आली आहे. जनरल अनिल चौहान, मे २०२१ मध्ये पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. जनरल बिपिन रावत यांना देशाचे पहिले संरक्षण प्रमुख होण्याचा मान मिळाला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत, त्यांच्या पत्नी आणि काही अधिकाऱ्यांसह ११ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत फक्त हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावले, ज्यांचा नंतर गंभीर भाजल्याने मृत्यू झाला होता.
आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तीन सेवांना एकत्रित करण्यासाठी हे पोस्ट तयार करण्यात आले आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) हे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात. राजकीय नेतृत्वाला निःपक्षपाती सल्ला देण्याबरोबरच ते संरक्षणमंत्र्यांचे मुख्य लष्करी सल्लागार आहेत.
गेल्या वर्षी ८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या या हेलिकॉप्टर दुर्घटनेची तिन्ही सेवांच्या पथकाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तामिळनाडूतील निलगिरी हिल्स येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य ११ लष्करी जवान शहीद झाले होते. अपघातात जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचा काही दिवसांनी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासात असे आढळून आले की, खराब हवामानामुळे वैमानिकाचे लक्ष विचलित झाले होते, ज्यामुळे हा अपघात झाला होता.