पुणे : वृत्तसंस्था
देशातील काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत मतांची चोरी झाल्याचे दाखवले. त्यावरून विरोधक आक्रमक होत रस्त्यावरदेखील उतरले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. या सर्व घडामोडीदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे होर्डिंग पुण्यातील पाषाण येथील रस्त्यावर लावण्यात आले आहे.
त्यात म्हटले आहे की, “अण्णा, आता तरी उठा… कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा. होय, मतांची चोरी झाली आहे. इंडिया अगेन्स्ट व्होटचोरी. देशात मतांची चोरी होत असताना, भ्रष्टाचार फोफावला असताना, देशात हुकूमशाही माजलेली असताना, लोकशाही धोक्यात असताना अण्णा, तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा,’ असा सवाल पोस्टरमधून करण्यात आला आहे. दरम्यान, अण्णांनी याला उत्तर दिले असून मी काम करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं ही अपेक्षा चुकीची आहे. केवळ बोटं दाखवून हे करा ते करा असे करून होणार नाही. तरुणांनी जागं होऊन आंदोलन करावे, असेही ते म्हणाले.