ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अण्णा हजारेंची नाराजी : लोकपाल अध्यक्ष यांच्यासह ७ जणांना महागड्या गाड्या !

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल व्यवस्था लागू करण्यात आली. पण आता लोकपाल अध्यक्ष व त्यांच्या 7 सदस्यांना आलिशान व महागड्या बीएमडब्ल्यू गाड्या घेऊन देण्यात येणार आहेत. लोकपालसाठी ऐतिहासिकस लढा देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपण भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा करतो आणि त्यानंतर भ्रष्टाचार होण्यासाठी कारवाई होत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे, असे ते म्हणालेत.

यासंबंधीच्या माहितीनुसार, लोकपाल अध्यक्ष व सदस्य अशा एकूण 7 जणांसाठी आलिशान BMW 3 Series 330Li मॉडेलच्या कार खरेदी करण्यात येणार आहेत.या सीरिजच्या एका कारची किंमत 70 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे त्यावर 5 कोटींहून अधिकचा खर्च येण्याची शक्यात आहे. सरकारने या प्रकरणी एक निविदा जारी केली आहे. पण विरोधकांच्या टीकेमुळे ही निविदा वादात सापडली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त करत केंद्राताली नरेंद्र मोदी सरकावर टीका केली आहे.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही एक क्रांतिकारी लढा लढला. आम्ही खूप झगडलो. संघर्ष केला. त्यातून लोकपाल पुढे आला. आपण भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा करतो. पण त्यानंतर भ्रष्टाचार होण्यासाठी कारवाई होत असेल तर ती फार दुर्दैवी गोष्ट आहे, असे अण्णा हजारे गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणालेत.

दुसरीकडे, अण्णांच्या माजी सहकारी तथा जनलोकपाल चळवळीच्या समर्थक किरण बेदी यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. पण त्यांनी महागड्या गाड्या खरेदीवर नव्हे तर परदेशी गाड्या खरेदी करण्यावर आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या, लोकपालची निर्मिती वायफळ खर्चासाठी करण्यात आली नाही. त्यामुळे असले निर्णय टाळायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः स्वदेशीवर भर देतात. त्यानंतरही लोकपालसाठी परदेशी गाड्या का खरेदी केल्या जात आहेत? आपल्याकडे चांगल्या भारतीय गाड्या नाहीत का? हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी मोहिमेच्या विरोधात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!