ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अन्नछत्र मंडळाकडून शहराचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम

भोसले महाप्रवेशद्वाराचे अक्कलकोट येथे लोकार्पण

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अन्नछत्र मंडळाकडून नेहमीच समाज हिताची कामे करण्यात आली आहेत. आता अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वारामुळे तर अक्कलकोटच्या वैभवात आणि सौंदर्यात नक्कीच भर पडेल पण या माध्यमातून शहराचा ऐतिहासिक ठेवा देखील जतन करण्याचे कामही अन्नछत्र मंडळांनी केले आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काढले.रविवारी,अक्कलकोट येथील फत्तेसिंह चौकात उभारण्यात आलेल्या आकर्षक अशा भव्य दिव्य महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

व्यासपीठावर समाधी  मठाचे पुजारी वे.सं आणू महाराज पुजारी, म.नि.प्र.बसवलिंग महास्वामी,धनंजय महाराज पुजारी,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या प्रमुख अलकाताई भोसले,अर्पिताताई भोसले,अन्नछत्र मंडळाचे अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे,सचिव शामराव मोरे, विश्वस्त चंद्रकांत कापसे,लाला राठोड,ऍड.नितीन हबीब,माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे यांच्यासह चेतन नरोटे, यशवंत धोंगडे,मनोज कल्याणशेट्टी, मल्लिकार्जुन पाटील,रईस टिनवाला,प्रथमेश इंगळे,सुनील बंडगर,अविनाश मडीखांबे,नन्नू कोरबू,सिद्धार्थ गायकवाड,बंटी राठोड,सुरेशचंद्र सूर्यवंशी,अकिल बागवान,बाळासाहेब कुलकर्णी – देसाई ,तम्मा शेळके,मैनोद्दीन कोरबू,शिवराज स्वामी,सद्दाम शेरीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशपाक बळोरगी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, महेश हिंडोळे,बाळासाहेब मोरे,बाबा निंबाळकर,स्मिता कदम यांनी अन्नछत्र मंडळाच्या सामाजिक सेवेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी केवळ अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भाविकांची सेवा केली नाही तर शहराच्या विकासात देखील मोठे योगदान दिले आहे,हे कुणीही  विसरता कामा नये.त्यांचे योगदान मोठे आहे,असे गौरवोद्गार सर्वच मान्यवरांनी काढले.प्रारंभी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फित कापून
या महाप्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले.

या महाप्रवेशद्वाराच्या कार्यात आर्किटेक्चर म्हणून काम पाहिलेले योगेश अहंकारी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. अक्कलकोट नगरपरिषद,उत्तर पोलीस ठाणे, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळासह राजे फत्तेसिंह चौक नवरात्र व गणेशोत्सव मंडळ,अमोलराजे लेझीम संघ व मित्र मंडळ,हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था अक्कलकोट तसेच चंद्रकांत सोनटक्के मित्रपरिवाराचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले.या कार्यक्रमासाठी पिंटू साठे,प्रवीण घाटगे, संतोष भोसले,राजु नवले,गोटू माने,पिंकू गोंडाळ,अतिष पवार,अंकुश चौगुले,शहाजी यादव,शीतल फुटाणे,सागर गोंडाळ,रोहित गंगणे,गिरीष गवळी,सरफराज शेख आदींनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार चंद्रकांत सोनटक्के यांनी मानले.

संगीत संध्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

महाप्रवेशद्वार उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर महाराष्ट्राचे महागायक मोहम्मद अय्याज व सहकालाकारांचा सुर सरगम प्रस्तुत ‘संगीत संध्या’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शहाजी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात गायक मोहम्मद अय्याज व सहकालाकारांनी हिंदी व मराठी लोकप्रिय गीतांसह भक्तीगीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

प्रवेशद्वारामुळे शहरवासीयांचे वेधले लक्ष

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या या प्रवेशद्वारावर कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, ब्रम्हांडनायक श्री स्वामी महाराज, राजमाता जिजाऊ, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न लता मंगेशकर, श्रीमंत विजयसिंहराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या प्रतिमा असून त्या संपूर्ण डिजिटल पद्धतीने साकारण्यात आले आहेत. त्यावर आकर्षक अशा रंगसंगतीमध्ये कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आल्याने शहरवासीयांसह भाविकांचे
लक्ष वेधून घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!