ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट येथील श्रीगुरूमंदिरात अन्नकोट महोत्सव भक्तीभावाने

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.२६ : राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आज्ञेनुसार स्थापन झालेल्या गुरुपीठ अर्थात श्री गुरुमंदिर (बाळप्पामठ) येथे गेल्या ७० वर्षापासून अन्नकोट महोत्सव दिपावली पाडव्याच्या दिवशी साजरा होत असतो. यंदाही हा महोत्सव मोठ्या थाटामाटात श्री गुरुमंदिर (चिन्मय पादुका मठ) येथे संपन्न झाला.कृष्णावतारात भगवान श्रीकृष्णांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी व पर्यावरण समृद्ध करण्यासाठी श्रीगोवर्धन पूजा अर्थात गोवर्धन पर्वताचे संगोपन व पर्यायाने पंचतत्वाचे संतुलन ही संकल्पना मांडलेली होती.

कृष्णावतारी केलेल्या त्या लिलेचा आजचाच दिवस होता. गोवर्धन पर्वत पूजेसाठी गोकुळातील आबालवृद्धांनी आणलेल्या शिदोरीचा नैवेद्य म्हणून वापर करण्यात आला होता. त्याचीच आठवण म्हणून श्रीगुरुमंदिर येथे गोवर्धन पूजा व अन्नकोट हा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये गोवर्धन पर्वताची प्रतिकृती बनवून त्यात गाई, वासरे,प्राणी, गवळणी मथुरेतील नागरिक व श्रीकृष्णांनी केलेल्या लीला यांच्या प्रतिकात्मक मूर्ती बनविल्या जातात व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्वत, नद्या झाडे, गवत, गाई, वासरे शेती, इत्यादीची किती आवश्यकता आहे व यांचे संगोपन करणे किती महत्त्वाचे आहे अशा प्रकारचा संदेश या अन्नकोट महोत्सवातून प्रतिकात्मक रूपातुन दिला जातो. यामध्ये ५६ प्रकारच्या मिठाया, फराळाचे जिन्नस, फळे इत्यादींची सुबक मांडणी यावेळी येथे केली जाते.या ठिकाणी मांडलेल्या मिठाया, फळे, फराळ जिन्नस आदी दुसऱ्या दिवशी भक्तांना प्रसाद म्हणून वितरित केले जातात.या अन्नकोट महोत्सवाची तयारी व मांडणी शेळगावच्या केसकर कुटुंबातील सदस्य करत आलेले आहेत तोच वारसा केसकराचे पुढील वंशज अत्यंत श्रद्धेने करत आहेत.

गोवर्धन अन्नकोट महोत्सवातुन पर्यावरण संरक्षण व पंचतत्वाचे संतुलन याबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने सुरू झालेला हा उत्सव आहे,असे श्री गुरूमंदिर व विश्व फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!