पुणे : वृतसंस्था
राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींनी जोर धरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनर्वसनाबाबत आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मोठी विधानं केली. तसेच, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे निर्देश आणि छावाचे नेते विजय घाडगे यांच्याशी झालेल्या भेटीवरही त्यांनी स्पष्टता आणली.
धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्यातील कथित घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले होते, परंतु उच्च न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिली आहे. याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. अजित पवार म्हणाले, कृषी खात्यातील आरोपांमुळे मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला, ज्याची भरपाई होऊ शकत नाही.
सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुंडे यांचे नाव जोडले गेले असून, याबाबत न्यायालयीन चौकशी सुरू आहे. “ही चौकशी पूर्ण झाल्यावर आणि मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्ट झाल्यास त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी दिली जाईल,” असं पवारांनी ठामपणे सांगितलं.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली असून, अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांशी बोलून कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय अंतिम करू.”