तुर्कीसह सीरिया आणि इराणमध्ये पुन्हा मोठा भूकंप झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सकाळी झालेल्या भूकंपात २०० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. परंतु आता आज दुपारी तुर्कीसह इराण आणि सीरिया पुन्हा ७.६ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं तुर्कीतील भूकंपात आतापर्यंत १३०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
भूकंपाच्या भीषण संकटाचा सामना करणाऱ्या तुर्की आणि सीरियाला मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आली आहे. त्यात तुर्की, सीरिया आणि इराणमधील भूकंपग्रस्तांची मदत आणि बचाव मोहिमेत मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या दोन टीम भारतातून रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफच्या या टीममध्ये १०० हून अधिक भारतीय जवानांना समावेश असणार आहे.
तुर्कीतील भूकंपाचा केंद्रबिंदू हे गझियानटेप शहर आहे. गझियानटेप शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर भूकंपामुळं जास्त वित्त आणि जीवीतहानी झालेली आहे. इस्तांबूल, दमास्कस, अलेप्पो, हमा आणि लताकिया या शहरांमधील अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या इमारती भूकंपामुळं कोसळल्याचं वृत्त आहे. गझियानटेप शहरापासून ३० किमी अंतरावर पहाटे ४.१७ च्या सुमारास पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर ११ मिनिटांनी पुन्हा मोठा भूकंप झाला. त्यानंतर १९ मिनिटांनी तिसरा भूकंप झाला. त्यानंतर आता दुपारी ७.६ रिश्टर स्केलचा पुन्हा मोठा भूकंप झाल्यामुळं अनेकांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.