मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील नेत्यांच्या अडचणीत वाढ होत असतांना नुकतेच काल धनंजय मुंडे यांना बीड प्रकरणातील देशमुख हत्याकांडबाबत राजीनामा द्यावा लागला असतांना आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने देखील जोर धरला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी आज 5 मार्च रोजी जिल्हा सत्र न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी १० टक्के योजनाअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. १९९५ मध्ये तत्कालीन अपक्ष आमदार आणि मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
तब्बल २९ वर्षांनंतर नाशिकच्या न्यायालयाने कोकाटे आणि त्यांच्या भावाला २० फेब्रुवारी २०२५ रोजी दोषी ठरवले. त्यांना २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५०,००० रुपये दंड ठोठावण्यात आला. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंच्या शिक्षेला २४ फेब्रुवारी २०२५ रोजी तात्पुरती स्थगिती दिली आणि प्रत्येकी १ लाखाच्या जामीनावर त्यांची सुटका केली.
कोकाटेंची न्यायालयात धाव
कोकाटे यांनी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सत्र न्यायालयात आपल्या शिक्षेवर स्थगिती देण्याची विनंती केली. न्यायालयाने हा निर्णय १ मार्चपर्यंत राखून ठेवला. त्यानंतर मुळ कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतरच निर्णय होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यासाठी पुढील सुनावणीची तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार आज कोकाटे यांच्या शिक्षेवर स्थगिती मिळते का, याचा निर्णय होणार आहे. दरम्यानम, सदनिका लाटल्याप्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षे शिक्षा ठोठावली होती. त्यानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास तो सभागृहात अपात्र ठरतो, असा कायदा करण्यात आला आहे.