जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्य ; जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती
सोलापूर, दि. 22 : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी व रात्री संचारबंदी लागू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेतील आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिना मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना गहू आणि तांदळाचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला गहू 2 रूपये किलो तर तांदूळ तीन रूपये किलो दराने वितरण करण्यात येत आहे. संचारबंदीमध्ये एप्रिल आणि मे 2021 या कालावधीसाठी अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना नियमित मासिक नियतनाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या परिमाणानुसार अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. धान्याचे वाटप तत्काळ करण्यात येणार असून ज्या लाभार्थ्यांनी एप्रिल 2021 अगोदरच धान्य खरेदी केले असेल तर मे 2021 साठी देय असलेले अन्नधान्य अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतीमाह प्रतिशिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य आणि प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी दिली.
ज्या लाभार्थ्यांनी एप्रिल 2021 चे धान्य खरेदी केले नसेल तर एप्रिल 2021 साठी देय असलेले अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. एप्रिल 2021 आणि मे 2021 या दोन्ही महिन्यांचे देय असलेले अन्नधान्य एकाचवेळी वितरित करण्यात येणार असल्याने संगणक कक्षाने रास्त भाव दुकानातील पीओएस मशिनवर दोन्ही महिन्यासाठी एकत्रितरित्या अन्नधान्य विक्री करण्याची व्यवस्था करण्यात यावी, एका महिन्याचे मोफत तर एका महिन्याची खरेदी करण्याची सुविधाही मशिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
परिमंडळ अधिकारी अ,ब, क आणि ड विभाग सोलापूर यांना त्यांच्या अधिनस्त रास्त भाव धान्य दुकानदार यांना अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेसाठी मे 2021 साठीचे नियतन मंजूर करण्यात आले आहे, लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. समिंदर यांनी केले आहे.