ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हास्तरीय पाचदिवसीय कृषि महोत्सव रविवारपासून शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर : कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने दि. ५ ते ९ मार्च २०२३ या कालावधीमध्ये लक्ष्मी विष्णू मिल मैदान, मरीआई चौक, सोलापूर येथे जिल्हा कृषि महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना/ उपक्रमांची माहिती देणे, संशोधन, कृषि तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास चालना देणे, तसेच धान्य व खाद्य महोत्सवाद्वारे थेट विक्रीला चालना देणे हा कृषि महोत्सवाचा हेतू असून अधिकाधिक शेतकरी, विद्यार्थी व नागरिक यांनी या महोत्सवास भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

या महोत्सवामध्ये कृषि प्रदर्शन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व धान्य महोत्सव, सेंद्रिय अन्नधान्य, कडधान्य, फळे इत्यादी विक्रीचे आयोजन केले आहे. तसेच फळबाग व फुलशेती लागवडबाबत आधुनिक तंत्रज्ञान, बदलत्या हवामानानुसार पीक पध्दती, डाळिंब लागवड तंत्रज्ञान व कीडरोग व्यवस्थापन, सघन आंबा लागवड तंत्रज्ञान, ऊस उत्पादन तंत्रज्ञान, पौष्टिक तृणधान्य आधारित पाककला स्पर्धा व त्यावरील प्रक्रिया संधी, आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पशु संवर्धन, दुग्ध उत्पादन व लंपी रोग व्यवस्थापन याबाबतची माहिती तज्ज्ञ व्यक्तिकडून परिसंवाद व चर्चासत्राद्वारे दिली जाणार आहे.

तसेच सुधारित शेती अवजारे, रेशीम शेती, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, प्रक्रिया उद्योग, अपारंपरिक ऊर्जा, शेती व्यवसाय तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, सेंद्रिय शेती, हरित पर्यावरण संकल्पना इत्यादी विषयाबाबतची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे, तसेच, महिला शेतकरी व पाककला विजेत्या महिला यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

कृषि प्रदर्शनामध्ये कृषि निविष्ठा, कृषि सिंचन स्टॉल, कृषि यांत्रिकीकरण स्टॉल, गृहउपयोगी स्टॉल अशा विविध प्रकारच्या स्टॉलची उभारणी करण्यात येणार असून उत्पादक ते ग्राहक दालनाच्या माध्यमातून माफक दरात थेट खरेदी व विक्री करण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तसेच, शालेय – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या जिल्हा कृषि महोत्सवास भेट देवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे व आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!