मुंबई : वृत्तसंस्था
24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण देण्यावरू आधीच राज्य सरकार अडचणीत सापडले असताना आता मनोज जरांगे पाटील यांच्या एका नव्या मागणीने पुन्हा सरकारसमोर तांत्रिक पेच निर्माण झालाय. आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून तिच्या मुलांना देखील जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केलीये. या मागणीमुळे सरकारसमोर नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
आई कुणबी असल्यास मुलाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, या मनोज जरांगेंच्या मागणीने सरकारसमोर तांत्रिक पेच निर्माण झालाय. कारण नोंदी सापडल्या तर रक्ताच्या नात्यात कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल असे सरकारने सांगितले होते. आता तोच आधार घेऊन आई आणि मुलाचे नाते हे रक्ता- मासाचे असल्यानं आईची जात मुलाला लागू करा असा आग्रह जरांगेंनी धरलाय.
आई आणि मुलाचे नाते हे रक्ता-मासाचे नाते असते. मग आईची जात मुलाला लावायला काय अडचण आहे असा मुद्दा समोर आलाय. मात्र जन्माने जात ठरवली जाते आणि आईची जात कुठलीही असली तरी मुलाला वडिलांची जात मिळते. त्यामुळे यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल, त्यामुळे आईची जात ही मुलाला देता येणार नाही असं सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.