हिवाळा सुरू झाला की बाजारात गाजरांची रेलचेल पाहायला मिळते. गाजराचा रस, गाजराचा हलवा, सॅलड आणि विविध मिष्टान्नांमुळे गाजर हिवाळ्यातील आहाराचा महत्त्वाचा भाग ठरतात. मात्र बाजारात उपलब्ध असलेली लाल आणि केशरी अशी दोन प्रकारची गाजरे पाहून अनेकांना नेमकं कोणतं गाजर अधिक आरोग्यदायी आहे, असा प्रश्न पडतो. लाल गाजर खावं की केशरी? याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.
लाल गाजर हे प्रामुख्याने हिवाळ्यातच उपलब्ध होतात. नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत लाल गाजर बाजारात दिसतात, तर केशरी गाजर वर्षभर सहज मिळतात. दोन्ही प्रकारची गाजरे आरोग्यासाठी फायदेशीर असली, तरी त्यांच्या पोषणमूल्यांमध्ये काही फरक आहे.
लाल गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीनसह व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लाल गाजर मदत करतात. हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी लाल गाजर उपयुक्त ठरतात. फायबरयुक्त लाल गाजर चयापचय सुधारतात, वजन नियंत्रणात ठेवतात आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले लाइकोपीन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते.
दुसरीकडे, केशरी गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण अधिक असून ते शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य, त्वचा आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी केशरी गाजर उपयुक्त मानले जातात. यामध्ये व्हिटॅमिन ए, ई तसेच विविध खनिजे मुबलक प्रमाणात असतात. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार राहते आणि वृद्धत्वाच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळते.
एकूणच पाहता, लाल आणि केशरी दोन्ही गाजरे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हिवाळ्यात लाल गाजरांचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तर वर्षभर केशरी गाजरे डोळे, त्वचा आणि हाडांसाठी लाभदायक ठरतात. त्यामुळे कोणतं गाजर अधिक फायदेशीर यापेक्षा, दोन्ही प्रकारची गाजरे संतुलित आहारात समाविष्ट करणं हेच आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरेल.