ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चिमण्यांच्या संवर्धनासाठी धडपडणारे अवलिया पक्षी मित्र अरविंद कुंभार

जागतिक चिमणी दिवस विशेष न्यूज

सोलापूर : प्रतिनिधी

अनादी काळापासून माणसाशी जवळीकता साधून असणाऱ्या मुठी एवढ्या आकाराच्या घरचिमण्या सध्या संकटात सापडले आहेत. दिवसेंदिवस त्याची संख्या घटत चालली आहे हे सर्वांच्या निदर्शनास आले आहे. माणसाच्या घरातील चिमण्यांची चिवचिवाट लुप्त होऊ नये, चिमण्यांची संख्या कमी होऊ नये व त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने येथील पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी गेली कित्येक वर्षे कृत्रिम घरटी बनवून गरजू व चिमण्यांवर प्रेम करणाऱ्यांना पुरवण्यात व्यस्त असतात. २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो.

या दिवसाचे औचित्य साधून महिन्यात डॉ. कुंभार मार्च महिन्यात सुमारे तीनशे ते चारशे कृत्रिम घरटी तयार करतात. तयार केलेल्या घरटी ज्यांना आवश्यकता असेल त्यांना मोफत देतात. बऱ्याच वेळा अशासकीय संस्था (एनजीओ) व शाळा महाविद्यालयात घरटी बनवायची कार्यशाळा आयोजित करतात.

घरात पडलेल्या कागदी पुट्टे वा कार्डबोर्ड यांना घरट्यांचा आकार देऊन, पोकळ बांबूचे तुकडे, फ्लेक्स बोर्ड कागद वापरून झाल्यावर राहिलेल्या पुट्ट्याच्या गुंडाळी, बॅडमिंटन शटल बाॅक्स, खाकी चिकट पट्टी व डिंक तसेच बांबूच्या सहा इंच काड्या हे टाकाऊ साहित्य वापरून डॉ. कुंभार घरटे तयार करतात. वाढती वृक्षतोड व सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे शहरांसह ग्रामीण भागात सुद्धा चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. त्यात भर पडली आहे मोबाईलच्या उंच मनोरे व भ्रमण लहरी. या कारणांमुळे चिमण्या मनुष्य वस्तीला रामराम ठोकून जंगलवासी होण्याला सरसावत आहेत. मोबाईल व वाहनांच्या अतिवापरामुळे त्यांचा चिवचिवाट ऐकू येत नाही. चिमण्यांची घटत चाललेली संख्या लक्षात घेता त्यांना वाचविण्याची गरज आहे म्हणून कृत्रिम घरटी तयार करून त्यांच्या संतानोत्पत्तीसाठी मानवकुल तत्परता दाखवायला पाहिजे असे डॉ. कुंभार म्हणतात.

डॉ. कुंभार यांच्या अकलूजमधील त्यांच्या निवासस्थानी भेटी देणाऱ्यांना ते चिमण्यासाठी घरटे भेट देऊन चिमणी संवर्धनाच्या कामाला हातभार लावतात.

चिमण्या आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून
मातीच्या भांड्यात पाणी भरून ठेवावेत, घराच्या अंगणात व गच्चीवर दररोज सकाळी पसाभर धान्य पसरवून टाकवेत, कृत्रिम घरटे आपल्या भिंतीला व पोर्चमध्ये अडकून ठेवावेत व मुलांच्या परीक्षा संपल्या की त्यांना कृत्रिम घरटी तयार करण्यास प्रवर्त करावे असे आवाहन डॉ. कुंभार आपल्या संवादातून करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!