मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नुकतेच शिवसेनेचे दोन दसरा मेळाव्या मोठ्या उत्साहात झाले. या शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे पार पडल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘X’वर एक पोस्ट करत शिंदे गटाच्या मेळाव्यातील गर्दी ‘भाडोत्री’ होती आणि मुख्यमंत्री शिंदेंचे भाषण सुरू होताच लोकांनी काढता पाय घेतल्याने त्यांना गेट बंद करून कोंडण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप केला आहे.
आपल्या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी दोन्ही मेळाव्यांची तुलना केली आहे. त्या म्हणतात, काल एकीकडे शिवतीर्थावर उद्धव साहेबांचे भाषण ऐकण्यासाठी कोसळत्या पावसात तसूभरही न हलता निष्ठावंत जीवाचा कान करून भाषण ऐकत होते. तर दुसरीकडे गद्दारांच्या इव्हेंटला जमवलेली भाडोत्री गर्दी मात्र शिंदे यांचे भाषण सुरू झाल्यावर काढता पाय घेत होती.
अंधारेंची X वरील पोस्ट काय?
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी X वर पोस्ट करत म्हटलंय की, काल एकीकडे शिवतीर्थावर उद्धव साहेबांचे भाषण ऐकण्यासाठी कोसळत्या पावसात तसू भरही न हलता निष्ठावंत जीवाचा कान करून भाषण ऐकत होते. तर दुसरीकडे गद्दारांच्या इव्हेंटला जमवलेली भाडोत्री गर्दी मात्र शिंदेंचे भाषण सुरू झाल्यावर काढता पाया घेत होती.गर्दीने जबरदस्ती भाषण ऐकावं म्हणून नेस्को चे गेट बंद करून कोंडण्याचे त्यांना प्रयत्न झाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक पक्षांचा आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही जणांना त्यांनी पळवले आहे, जे पळवले ते पितळ होते, सोनं माझ्याकडेच आहे. वाघाचे कातडे पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहीत आहे. आत्ता येताना मी पाहिले की बाळासाहेब ठाकरे यांची भगवी शाल पांघरलेल्या गाढवाचे चित्र मी पहिल्यांदाच पहिले. कितीही शाली टाकल्या तरी गाढव ते गाढवच.
आज सारखी परिस्थिती या आधी आली नव्हती. हे संकट फार मोठे आहे. शिवसेनेने एक गाव दत्तक घेतले होते. आता आपले सरकार नाही पण जी काही मदत करता येईल ती आपण करू. आपल्या आयुष्याचे सार्थक होईल. कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत, माणसं कशी बदलतात बघा, आज ते मुख्यमंत्री झाल्यावर म्हणतात ओला दुष्काळ अशी संज्ञाच नाही. खड्ड्यात घाला सगळे निकष अन शेतकऱ्यांना मदत करा. हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मी कर्जमाफी केली होती. पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी ही घोषणा केली होती, तशी आता या सरकारने कर्जमुक्ती करावी. शेतकरी वाट बघत आहेत. 2017 ची कर्जमुक्ती अजून होत नाही. कोरोनाचे संकट आले आणि नंतर एक गोष्ट करायची राहिली जो नियमित कर्ज भरतो त्याला 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी देणार होतो. पण गद्दार गेले निघून आणि ते अर्धवट राहिले.