ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हे सरकार गेल्यातच जमा,आमचे सरकार आणा ; ठाकरेंचा घणाघात !

शिर्डी : वृत्तसंस्था

केंद्र व राज्य सरकारला नेहमीच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विरोधक चांगलेच धारेवर धरत असता, नुकतेच माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुनी पेन्शन योजनेच्या महाअधिवेशनात कर्मचाऱ्यांना संबोधित करताना आंदोलकांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी या आंदोलक कर्मचाऱ्यांना विनंती केली की उपोषण करू नका, या सरकारवर उपोषणाची वेळ आणा, असे आव्हान केले. तसेच जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू, तुम्ही फक्त आम्हाला निवडून आणा, असेही आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ही जुनी पेन्शन योजना आपण सगळे मिळून खेचून आणू. तुमची एकजूट पाहता हे सरकार गेल्यातच जमा आहे. आमचे सरकार आणा, जुनी पेन्शन योजना अंमलात आणतो. सरकारच्या योजना राबवणारे तुम्ही आहात, लोकांच्या घराघरात जाऊन तुम्ही सरकारचे काम करता, तरी योजनेच्या पोस्टरवर फोटो या दाढीवाल्यांचे लागतात, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना बहीण आहे हे माहीत नव्हेत, निवडणुका जवळ आल्या की यांनी लाडकी बहीण योजना काढली, असा टोला त्यांनी लगावला आहे. कोरोनाच्या काळात तुम्ही सगळ्यांनी जिवावर उदार होऊन कामे केलीत म्हणून महाराष्ट्र वाचला आहे. तरी सुद्धा हे सरकार तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन देत नाही. आपले सरकार पुन्हा आणा, आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन मिळवून देऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मला कोणीही सत्तेतून काढू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचेकडे कुठे सत्ता होती, पण तरी त्यांच्याकडे सत्ता होती, जनतेची सत्ता होती. तशीच ही जनताच माझी सत्ता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, कर्मचाऱ्यांनी साथ दिली नाही तर सरकारच चालू शकत नाही. तुम्ही घरोघरी जाऊन सरकारच्या योजना पोहोचवण्याचे काम करता मात्र श्रेय हे घेतात आणि म्हणतात सरकार आपल्या दारी, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!