आपण ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदे मिळतात, सत्ताधारी सरकारमधील “या नेत्याने” बोलून दाखवली मनातील खदखद
लोणावळा : आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोणावळा येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच दोन दिवसीय चिंतन-मंथन शिबिर भरवण्यात आलं होतं. या चिंतन-मंथन शिबिराचा सांगता आज करण्यात आला.या परिषदेत सत्ताधारी विरोधी पक्षातील ओबीसी समाजातील नेते उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील मंत्रिमंडळात असताना देखील मनातील खदखद बोलून दाखवली. आपण ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदे मिळतात, असा थेट दावा वडेट्टीवार यांनी बोलण्यातून केल्याचं दिसून आले. राज्याचा विरोधी पक्ष नेता हे पद आपण सांभाळलं होतं. त्यामुळे सत्ता आली त्यावेळेस महसूल मंत्रिपद मिळेल, असं वाटलं होतं. पण ओबीसी म्हणून मला ओबीसीचं खातं मिळालं, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार,माणिकराव ठाकरे, बबनराव तायवाडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर नेते उपस्थित होते.